Sharad Ponkshe: मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे सध्या 'पुरुष' या नाटकामुळे चर्चेत आहेत. जयवंत दळवी लिखित 'पुरुष' या नाटकाचे प्रगोग संपुर्ण महाराष्ट्रात होत आहेत. या नाटकात अभिनेते शरद पोंक्षे यांच्यासह अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेते अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नुकतंच या नाटकाचा प्रयोग बीड जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये झाला. पण, बीडमध्ये प्रयोग करताना शरद पोंक्षे यांना वाईट अनुभव आला. नाट्यगृहाच्या अस्वच्छतेसंदर्भात शरद पोंक्षे यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
शरद पोंक्षे यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ते नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांसमोर नाट्यगृहांची परिस्थिती फारशी चांगली नसल्याची खंत व्यक्त करताना दिसून आले. ते म्हणाले, "एवढ्या लांब इतका प्रवास करुन आम्ही येत असतो. एवढे चांगले रसिक प्रेक्षक आणि इतका चांगला प्रतिसाद त्यासाठी सर्वांचं कौतूक. परंतु रसिकहो... इथं पुन्हा येणं आता आम्हाला शक्य नाहीय. कारण नाट्यगृहाची दुरवस्था, एसी थिएटरचं भाडं म्हणून आमच्याकडून २१ हजार रुपये घेतले. पण नाट्यगृहात एअर कंडिशनर सुद्धा नाही. मुंबईतल्या नाट्यगृहात सुद्धा इतकं भाडं नाही".
"प्रसाधनगृह नाही. बाथरुमची इतकी वाईट अवस्था की, महिला कलाकारांना जाणंच शक्य नाही. इथं मेकअप रुम देखील नाही. स्वच्छता नाही. या नाट्यगृहाला कुठला वालीच नाही. आज शासनाचे खूप मोठे अधिकारी इथं बसलेत. त्यांनी दखल घ्यावी, ही नम्र विनंती. ज्या कुणाच्या अंडर हे नाट्यगृह येत असेल, त्यांना बोलवून सांगा की जर अशीच नाट्यगृहाची अवस्था ठेवली, दर्जेदार नाटकं आणि कलाकारांपासून बीडचे रसिक-प्रेक्षक मुकेल".
"मला तर इथे परत यायची इच्छाच नाही. मी बीडला येईन, तुम्ही कार्यक्रमाला बोलावलंत तर तिकडे येईन, पण या थिएटरमध्ये येऊन नाटक करावं अशी आमची इच्छा आज मेली. खूपच भयानक परिस्थिती आहे. नाट्यरसिकांची सुद्धा नागरिक म्हणून एक जबाबदारी आहे, तुम्ही याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण बीडमध्ये चांगलं नाटक येणं बंद होईल. कारण अशा अवस्थेत आम्ही नाटक नाही करू शकत. मी बोलतोय त्याचा फार काही परिणाम होणार नाही याची मला खात्री आहे, कारण मी या विषयावर १००० वेळा बोलून झालंय, पण राहवत नाही. फार वाईट अवस्था आहे".