Join us  

ट्विटरवर कविता शेअर केल्याने बिग बी गोत्यात, १ कोटींचा दावा ठोकला

By admin | Published: May 28, 2015 12:35 PM

बिग बी अमिताभ बच्चन फेसबुक व ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्सद्वारे चाहत्यांशी संवाद साधण्यास पसंती देत असले तरी आता याच साईटवरील एक पोस्ट बिग बींसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २८ -  बिग बी अमिताभ बच्चन फेसबुक व ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्सद्वारे चाहत्यांशी संवाद साधण्यास पसंती देत असले तरी आता याच साईटवरील एक पोस्ट बिग बींसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. एका चाहत्याने पोस्ट केलेली कविता शेअर केल्याप्रकरणी अमिताभ बच्चन यांच्यावर एक कोटी रुपयांचा दावा ठोकण्यात आला आहे. 

अमिताभ बच्चन हे सोशल मिडीयावर सर्वाधिक सक्रीय असलेले बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या ट्विटर अकाऊंटवर विकास दुबे नामक व्यक्तीने 'कोर्ट का कुत्ता' ही कविता टाकली होती.  अमिताभ यांनीदेखील ही कविता विकास दुबेंच्याच नावाने शेअर केली. 'माझा फोलोअर विकास दुबे यांची आणखी एक मार्मिक कथा' असे त्यांनी कविता शेअर करताना म्हटले.  
अमिताभ बच्चन यांचे ट्विट बघून हरियाणातील महर्षी दयानंद विद्यापीठातील युथ वेलफेअर विभागाचे संचालक जगबीर राठी यांना धक्काच बसला. राठी यांनी २००६ मध्ये माटी का चूल्हा हे पुस्तक लिहीले असून याच पुस्तकात त्यांनी 'कोर्ट का कुत्ता' ही कविता लिहीली होती. राठी यांनी अमिताभ बच्चन व विकास दुबे या दोघांनाही मेल पाठवून हा प्रकार निदर्शनास आणून दिला. १५ दिवसांनंतरही दोघांनीही उत्तर न दिल्याने राठी यांनी कायदेशीर मार्ग अवलंबला आहे. या शेअर संदर्भात अमिताभ बच्चन यांनी १५ दिवसांत स्पष्टीकरण द्यावे व १ कोटी रुपयांची भरपाईदेखील द्यावी अशी मागणी राठी यांनी केली आहे.