थ्री इडियट्स फेम राजू अर्थात अभिनेता शर्मन जोशी याचा आज वाढदिवस. गुजराती रंगभूमीवरून करिअरची सुरुवात करणा-या शर्मनने ‘गॉडमदर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण त्याला खरी ओळख दिली ती ‘स्टाईल’ या सिनेमाने. यानंतर ‘रंग दे बसंती’, ‘थ्री इडियट्स’ या आमिर खानसोबतच्या सिनेमामुळे तो चर्चेत आला. यानंतर शर्मन ब-याच सुपरहिट सिनेमांत दिसला. त्याच्या कॉमेडीवर लोक फिदा आहेत. पण करिअरच्या सुरुवातीला चित्र थोडे वेगळे होते.
होय, शर्मनचा कॉमिक टायमिंग बराच खराब होता. खुद्द शर्मनने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. आधी माझा कॉमिक टायपिंग फार खराब होता. यावरून मला खूप टीकाही सहन करावी लागली. पण काम करत गेलो आणि माझ्यात सुधारणा होत गेली.
फार क्वचित लोकांना ठाऊक असेल की, ‘फेरारी की सवारी’ या सिनेमासाठी शर्मनने एकदा, दोनदा नाही तर तब्बल 40 वेळा ऑडिशन दिले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा होते. यांच्यासोबत शर्मनने थ्री इडियट्समध्येही काम केले होते. पण ‘फेरारी की सवारी’साठी शर्मनला बराच घाम गाळावा लागला. या चित्रपटातील लीड रोल मिळवण्यासाठी त्याने 40 वेळा ऑडिशन दिले होते.
शर्मन एका मराठी कुटुंबातील असून त्याचे वडील अरविंद जोशी गुजराती थिएटरचे दिग्गज कलाकार आहेत. शिवाय त्याच्या या कुटुंबातील इतर सदस्य सुध्दा थिएटरशी जुळलेले आहेत. शर्मनला स्वत:ला थिएटरमध्ये काम करण्याची आवड आहे.