Join us

"ज्या मंडळांमधे योग्य वागणूक दिली जात नाही...", मराठी अभिनेत्रीनं व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 5:41 PM

नामांकित मंडळांमध्ये भक्तांना चुकीची वागणूक दिल्याचंही समोर आलं आहे.

सध्या संपूर्ण राज्यात गणोशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहेत. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं. काही नामांकित मंडळांमध्ये भक्तांना चुकीची वागणूक दिल्याचंही समोर आलं आहे. सामान्य भाविकांना अक्षरश: ढकललं जात आहे. याचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. यावर मराठी अभिनेत्रीने संताप व्यक्त केला.

'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतील अभिनेत्री शर्मिला शिंदेने ( Sharmila Shinde ) पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहलं, "मी लहान होते, तेव्हा आमची आई आम्हाला खूप कष्टाने मानाच्या गणपतींचं दर्शन घडवायची. गर्दीत चेंगरत चेंगरतच दर्शन घ्यायचो आम्ही सुद्धा… पण, आता मी एक कलाकार आहे. मला फार प्रेमाने आणि आदराने मंडळं आरतीसाठी आमंत्रित करतात म्हणून मी जाते".

पुढे ती म्हणते, "इतरांनी ज्या मंडळांमधे योग्य वागणूक दिली जात नाही, तिथे जाणं टाळा. देव सर्वत्र आहे. घरी बसून नमस्कार करा. आपला माणुसकीचा कोटा (Quota) high ठेवा. आपल्या आई वडिलांची काळजी घ्या. त्यांची म्हातारपणी सेवा करा. माणसांसाठी आणि इतर प्राणिमात्रांसाठी मनात दया-माया असुद्या. दुसऱ्यांच्या लेकरांना स्वतःच्या लेकरांप्रमाणे प्रेमाने वागवा. बास! यापेक्षा मोठी भक्ती काय असेल. गणपती बाप्पा मोरया!", असं ती म्हणाली. 

याशिवाय शर्मिला शिंदेने भाविकांनाही जी मंडळं भाविकांना नीट वागवतात, तिथे सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. शर्मिलाच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'बरोबर बोललीस ताई तू', 'देव सगळीकडे आहे', 'छान', अशा कमेंट केल्या आहेत. शर्मिला ही एक मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. विविधांगी भूमिका साकारून शर्मिलाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. अभिनयाबरोबरच शर्मिला तिच्या बेधडक स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वासाठीदेखील ओळखली जाते.

 

 

टॅग्स :मराठी अभिनेतागणेशोत्सव 2024सेलिब्रिटी गणेशमुंबई