Sharmila Tagore Birthday: कश्मीर की कली, वक्त, आमने सामने असे शानदार सिनेमे देणा-या अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा आज वाढदिवस. एकेकाळी बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणा-या शर्मिला यांनी सत्यजीत रे यांच्या ‘अपुर संसार’ या चित्रपटातून अॅक्टिंगला सुरुवात केली. 1964 साली त्यांचा पहिला बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे नाव होतं ‘कश्मीर की कली’. या चित्रपटानं शर्मिला यांना एक वेगळी ओळख दिली. पण यानंतर ‘अॅन इव्हिनिंग इन पॅरिस’ या चित्रपटात शर्मिला यांनी एक बिकिनी सीन दिला आणि त्यांच्या या सीनने खळबळ माजली. देशाच्या संसदेतही हा मुद्दा गाजला होता.
याच बिकिनी सीनशी संबंधित एक किस्सा क्वचित लोकांना ठाऊक असेल. होय, ‘अॅन इव्हिनिंग इन पॅरिस’च्या रिलीजवेळी शर्मिला आणि क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. अफेअरच्या या चर्चा घरच्यांच्याही कानावर गेल्या. एकदिवस अचानक मन्सूर यांची आई भेटायला येत असल्याचा निरोप शर्मिला यांना आला आणि शर्मिला अडचणीत आल्या. कारण काय तर अख्ख्या मुंबईत त्यांच्या ‘अॅन इव्हिनिंग इन पॅरिस’ या चित्रपटातील बोल्ड बिकिनी सीनचे पोस्टर्स व मोठ मोठे होर्डिंग्स लागले होते. होणा-या सासूने आपल्याला बिकिनीमध्ये पाहिले तर काय होईल, या भीतीने शर्मिला यांना घाम फुटला होता.
मन्सूर यांची त्या पोस्टर्सवर काहीच हरकत नव्हती कारण तो शर्मिला यांच्या कामाचाच एक भाग होता. पण होणाºया सासूबाईंची प्रतिक्रिया काय असेल? या चिंतेने शर्मिला यांना कापरं भरलं होतं. मग काय? शर्मिला यांनीच या समस्येवर एक नामी युक्ती शोधून काढली.
त्यांनी निर्मात्यांना फोन करुन रात्रीतून मुंबईत ज्या ज्या ठिकाणी बिकिनीधील पोस्टर लावण्यात आले होते ते काढून टाकण्यास सांगितलं आणि एका रात्रीत शर्मिलांच्या मुंबईतील रस्त्यांवरचे बिकनी पोस्टर्स हटवले गेले. तेव्हा कुठे शर्मिलांचा जीव भांड्यात पडला. निश्चिंत होत त्यांनी मन्सूर यांच्या आईची भेट घेतली. त्यानंतर शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांचं लग्न झालं.
लोक मला ते विसरू देत नाहीत...शर्मिला यांनी रिअल लाईफमध्ये अनेक निर्णय प्रवाहाविरूद्ध घेतले. 1966 साली केलेलं बिकिनी फोटोशूटही यापैकीच एक होतं. हे फोटोशूट करताना खरं तर शर्मिला यांच्या मनात तिळभरही लाज किंवा संकोच नव्हता. पण त्या काळात असं फोटोशूट म्हटल्यावर लोकांनी शर्मिला यांच्यावर जबरदस्त टीका केली होती. अगदी संसदेतही यावरून रान माजलं होतं. एका मुलाखतीत शर्मिला यावर बोलल्या होत्या. लोक मला ती गोष्ट कधीच विसरू देत नाही..., असं त्या म्हणाल्या होत्या.
त्या म्हणाल्या होत्या, ‘तेव्हा आपला समाज प्रचंड रूढीवादी होता. त्याकाळात मी ते फोटोशूट केलं. पण मी ते का करतेय, याचा मला काहीही अंदाज नव्हता. माझ्या लग्नाच्या काही दिवस आधी मी ते फोटोशूट केलं होतं. मला आठवतं, जेव्हा मी फोटोग्राफरला 2 पीस बिकिनी दाखवली होती, तेव्हा तोही विचारात पडला होता. तुला नक्की ही घालायचीय? असं त्याने मला विचारलं होतं. काही शॉट्समध्ये तर त्याने स्वत: मला बॉडी कव्हर करण्यास सांगितलं होतं. माझ्यापेक्षा जास्त फोटोग्राफरला टेन्शन आलं होतं. मी मात्र अगदीच कम्फर्टेबल होते.
ते फोटो प्रसिद्ध झाले आणि माझ्यावर प्रचंड टीका होऊ लागली. तो माझ्यासाठी मोठा धक्का होता. मी चांगली दिसत होते, मग लोकांना हे फोटो का आवडले नाहीत? असा प्रश्न मला पडला होता. काही लोकांनी याला पब्लिसिटी स्टंट म्हटलं, त्याचं मात्र मला खूप दु:ख झाले होते. मी ते फोटोशूट केलं कारण मी स्वत:ला प्रेझेंट करू इच्छित होते. मी तरूण होते आणि नवी आव्हाने स्वीकारण्यास उत्सूक होते, असं त्या म्हणाल्या होत्या.