शशांक केतकर हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनयाबरोबरच तो त्याच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखला जातो. समाजतातील घडामोडींवर तो परखडपणे त्याचं मत मांडतो. आता शशांकने घाटकोपर बोर्डिंग दुर्घटनेवरुन सरकार आणि राजकीय पक्षांना खडे बोल सुनावले आहेत. शशांकने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाला शशांक केतकर?
"काल मुंबईत आलेल्या एका वादळामुळे काही घटना घडल्या. घाटकोपरमध्ये १२० फूट *१२० फूट असं मोठं होर्डिंग एका पेट्रोल पंपवर पडलं. दुर्देवाने तेव्हाच पाऊस पडत असल्याने काही जणांनी त्याखालीच आसरा घेतला होता. त्यांच्या अंगावर तो बोर्ड पडला आणि जे कधीच घडू नये ते घडलं. आजचा मृतांचा आकडा १४ हा आहे. हे सगळं बघून मला कुठलाच पक्ष किंवा राज्यकर्त्याला काहीच म्हणायचं नाहीये. कारण, ही नैसर्गिक आपत्ती होती. त्यात आपल्या कुणाचाच प्रत्यक्षरित्या सहभाग नाही. पण, घडलेल्या घटनेनंतर मला हे जाणवलं की आपल्या देशाची लोकसंख्याच इतकी आहे की आपल्या जीवाची आणि जगण्याची फार किंमत आपल्या देशात नाही. हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होतंय. गेल्या काही वर्षात आपल्या देशात खूप छान प्रगती होतेय. ज्याचं कौतुक आहेच. पण, अनेक गोष्टी आहेत ज्या सुधारणं गरजेचं आहे.
पण, हे नेमकं काय आहे? १२० फूटचा बोर्ड वाऱ्याने पडतो? आता तो बोर्डच अनधिकृत असल्याचं समजत आहे. एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षावर आरोप होत आहेत. त्यांच्या राज्यात परवानगी होते आणि तेव्हा तो बोर्ड लावला गेला होता. मग असं समजलं की ४०*४० फूट बोर्ड लावायचीच मुंबईत परवानगी आहे. मग १२० फूटाचा बोर्ड कसा काय उभा राहिला? बरं आज तो पडला म्हणून तो अनधिकृत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. तो बोर्ड अनधिकृतरित्या लावण्यात आला असेलही...जो मालक होता तो आता पळूनही गेलाय. पण, उद्या आणखी ४ बोर्ड पडले ते पडले की मग कळेल ते पण अनधिकृत होते. मुंबईत जे फ्लायओव्हर आहेत तिथे एकही CCTV कॅमेरा नाही. इतका मोठा ब्लंडर कसा काय असू शकतो? एखाद्या ब्रीजवर अपघात झाला तर तो तुम्ही कव्हर कसा करणार? कोणाची चूक, कोण बरोबर? हे कसं ठरवणार? मी ठाण्यात राहतो. मला रोज मडहून ठाण्याला जाताना घोडबंदर रोड घ्यावा लागतो. त्या घोडबंदर रोडला एक चौपाटी तयार होतेय. ते चांगलंही आहे. पण, त्याचबरोबरच गाड्या वाढल्यात, लोकसंख्या इतकी आहे. मग रस्ते वाढवण्याची काम पटापट व्हायला नको का? ही कुणाची जबाबदारी आहे? कुठली महानगरपालिका, कुठलं सरकार...याच्याशी मला घेणं देणं नाही. ही सत्तेत असलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. ट्राफिकमुळे लोक चुकीच्या दिशेने गाड्या चालवतात. त्यामुळे माझ्या किंवा इतर कोणाच्या गाडीचा अपघात झाला. तर त्याची जबाबदारी कोणती महानगरपालिका, कोणतं राज्य सरकार किंवा केंद्र सरकार घेणार आहे? मृतांच्या आईवडिलांना किंवा नातेवाईकांना नुसते पैसे दिले म्हणजे जबाबदारी घेतली असं होत नाही. तेच सगळे पैसे आणि निधी रस्त्यांसाठी वापरा.
शशांकचा राजकीय नेत्यांना थेट सवाल!
मी एका मुलाचा बाप आहे. नशीब आता शाळा सुरू नाहीयेत. जर मुलांनी भरलेली शाळेत जाणारी व्हॅन CNG भरण्यासाठी त्या पेट्रोल पंपाच्या खाली उभी असती. आण तो बोर्डे पडला असता. तर किती लहान मुलांचा जीव गेला असता. तुम्हाला काहीतरी सेन्स आहे का? तुमच्या डोक्यात काही शिरतंय का? मी मागेदेखील एक रस्त्याचा व्हिडिओ टाकला होता. ज्यामुळे माझ्याच गाडीचे टायर बर्स्ट झाले होते. त्या रस्त्यावर सिमेंट रस्त्याच्या सळई बाहेर निघाल्या होत्या. ती सळई माझ्या गाडीच्या चाकात घुसून चाक फुटलं. याचे पैसे मला कोण देणारे? एखादा राजकीय नेता बाईकवरुन त्याच्या छोट्या मुलासह चालला आहे. गाडी घसरली आणि एखादी गाडी त्याच्या डोक्यावरुन गेली तर कसं वाटेल तुम्हाला? राजकारणी लोकांना लाजा नाही वाटत का? मी सुजाण नागरिक आहे. मी वोटिंगही केलेलं आहे. पण, कृपा करून हे अनधिकृत बोर्ड आणि फ्लेक्स लावणं बंद करा. फ्लेक्सवरील तुमचे मोठेमोठे फोटो आणि त्याच्या खाली तुमच्या कार्यकर्त्यांचे छोटे छोटे फोटो बघण्यात आम्हाला कुठलाही इंटरेस्ट नाही. लोकांचे नाहक जीव जात्यात, त्याच्याकडे लक्ष द्या. कोण सरकारमध्ये येईल कोणी येणार नाही, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. तुमच्या इगोसाठी आमचे जीव घेऊ नका. कालचा बोर्डिंग पडल्याचा व्हिडिओ बघितल्यापासून मला असं झालं की लोकांचा काय दोष आहे? लोक भरडले जात्यात. आमचे जीव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. देश जागतिक पातळीवर खूप गाजतोय पण मुलभूत गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज आहे. इतके निधी तुमच्याकडे येतात. ४-५ मुद्द्यांच्या पलिकडे तुम्हाला काही दिसत नाही का?
अनधिकृत बांधकामांवरुन शशांक संतापला!
मी अंधभक्त किंवा काँग्रेसविरोधी आहे असं अजिबात नाही. मी एक भारतीय नागरिक आहे. आणि अशा घटना घडल्या की मला त्रास होतो. हे सगळं बघितल्यावर माझं रक्त खवळतं. बोर्ड लावलेला माणूस पळून गेला आहे. पण जरा विचार करा जर तिथे भाजपा किंवा काँग्रेस,शिवसेना, मुंबई इंडियन्स किंवा आमच्याच एखाद्या सिनेमाचं होर्डिंग असतं तर त्यांच्या लिगल टीमवरही शंका घ्याव्या लागल्या असत्या. की काय सर्व्हे करतात वगैरे? देशात फक्त गोंधळ आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहे. हे सगळं थांबवुया. आता नागरिक म्हणून आपण देश सुधारवायला हवा. दुर्देवाने आपल्या घरातील कोणी मरत नाही तोपर्यंत आपल्यापर्यंत त्याची झळ पोहचत नाही. आपण तेवढ्यापुरतं वाईट झालं म्हणतो, आणि आपल्या कामाला लागतो. मी फक्त नागरिक म्हणून हे सगळं सांगतोय. माझा हा व्हिडिओ व्हायरल करा. आवाज उठवूया. तो मालक मिळालाच पाहिजे...त्याला शिक्षा झालीच पाहिजे. या अनधिकृत गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. मीरारोडमध्ये एका कॉम्प्लेक्समध्ये २०१३ साली मी घेतलेलं एक घर आहे. जे मला आजतागायत मिळालेलं नाही. २१ मजली ९ बिल्डिंगचं टॉवर उभं राहेपर्यंत सरकार, महानगरपालिका झोपली होती का? अनधिकृत बिल्डिंग का बांधू देतात? मी राज्य सरकारला सांगू इच्छितो की अशी अनधिकृत बांधकाम तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या. तुम्ही ते म्हाडाच्या नावाखाली विकसित करून विका. कारण, कुठलाच बिल्डर आता त्यात हात घालणार नाही. आणि आमचे पैसे घालून बसलेले आहोत. आम्ही फ्लॅट घेतले तेव्हा बँकांनीच लोन दिलेले आहेत. मग त्यांनी डॉक्युमेंट चेक नाही केलं का? मी अजून बँकेचे पैसे भरतोय. या गोष्टी कधी थांबणार? सगळं नुसतं कौतुक चाललंय देशात...लोकांचे जीव जात्यात...बास करा आता हे...