अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) अनेकदा सामाजिक प्रश्नांवर भाष्य करतो. मुंबईतील रस्त्यांची अवस्था, खड्डे, कचरा याकडे तो नागरिकांचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधतो. अनेकदा त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओनंतर महापालिकेने त्वरित कारवाईही केली आहे. मात्र अजूनही असे बरेच भाग आहेत जिथे स्वच्छता नाही. रस्त्यांची अवस्था बिकट आहे. शशांकने पुन्हा एकदा व्हिडिओ शेअर करत प्रशासनाला लक्ष्य केलं आहे.
घोडबंदर रोड ते मढ आयलंडपर्यंत जाताना दीड ते २ तास लागतात. शशांक शूटिंगसाठी रोज इतका प्रवास करतो. घोडबंदर रोडची अवस्था तर सगळ्यांनाच माहित आहे. पण तो रस्ता बरा की काय इतकी वाईट अवस्था मढ आयलंडच्या रस्त्यांची आहे असं शशांक म्हणतोय. याची झलकही त्याने व्हिडिओमधून दाखवली आहे. मढ आयलंडवर अनेक मालिका, सीरिजचं शूट सुरु असतं. त्यामुळे इथे बरीच रेलचेल असते. मालाड वेस्टला मालवणी पोलिस स्टेशन आणि चर्च यांच्यामध्ये असलेल्या भागाची काय अवस्था असते हे त्याने दाखवलं आहे. सकाळचं चित्र वेगळं तर रात्रीचं चित्र पूर्ण वेगळं दिसतं. तो भाग कचऱ्याने भरलेला असतो. तिथेच अनेक गायी चरायला येतात. बाजूला बदाक शेकची गाडीही आहे. अशा ठिकाणाहून नागरिक प्रवास करतात तर काहींची तिथे वस्तीही आहे.शशांक लिहितो, "सरकार कोणतेही असो… आपली आणि आपल्या देशाची अवस्था कधी सुधारणार? ही जबाबदारी नेमकी कोणाची? इतका निर्लज्जपणा येतो कुठून?
सरकार बदललं की सगळं बदलेल वगैरे फालतू पर्याय सुचवू नका! गेली अनेक वर्ष आपला देश अस्वच्छ देशांच्या यादीत अग्रेसरच आहे.. त्यामुळे या आधीच्या अनेक सरकारांनी सुद्धा काही आपल्याकडे, या issues कडे, सपशेल दुर्लक्षच केलं आहे. काहीतरी कायमस्वरूपी उपाय हवा आहे देशाला. माझा हा राग, संताप ….हा या अवस्थेबद्दल आहे… कोणा एका व्यक्ती किंवा party बद्दल नाही."
शशांकच्या या व्हिडिओवर कमेंट करत लोकांनी त्याला पाठिंबा दिला आहे. अनेक ठिकाणी हीच अवस्था आहे अशीच बऱ्याच जणांची भूमिका आहे.