राज कपूर यांच्या कुटुंबात जन्मलेले दिग्गज अभिनेते शशी कपूर यांचा आज (१८ मार्च) ८१ वा वाढदिवस. आज शशी कपूर आपल्यात नाहीत. पण त्यांचे अजरामर चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. आपल्या फिल्मी करिअरमध्ये शशी कपूर यांनी १०० पेक्षा अधिक चित्रपटांत काम केले. यापैकी बहुतेक चित्रपट बॉक्सआॅफिसवर हिट ठरले. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘साईड स्ट्रिट’ हा शशी यांचा अखेरचा चित्रपट होता.
शशी कपूर यांनी अनेक हिट चित्रपट दिलेत. पण यापैकी काही चित्रपट प्रचंड वादग्रस्त ठरलेत. त्यांच्या वादग्रस्त चित्रपटांतील पहिल्या चित्रपटाचे नाव होते, ‘सिद्धार्थ’. या चित्रपटात अनेक आक्षेपार्ह दृश्ये होती. पण चित्रपटाची लीड हिरोईन सिमी ग्रेवाल आणि शशी कपूर यांनी कुठल्याही संकोचाशिवाय हे बोल्ड सीन्स दिलेत. इंग्रजी भाषेत रिलीज झालेल्या या चित्रपटात एके ठिकाणी सिमी ग्रेवाल यांचा न्यूड सीन होता आणि शशी कपूर यांना त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहायचे होते. हा सीन दोन इंग्रजी नियतकालिकांच्या कव्हर पेजवर छापला गेला आणि प्रचंड रान माजले. प्रकरण कोर्टात गेले. बॉलिवूडचा हा पहिला न्यूड सीन होता. या सीनमुळे ‘सिद्धार्थ’ या चित्रपटावर भारतात बंदी लादली गेली.
त्यांच्या अन्य एका चित्रपटाने वाद नाही पण हिरोईनचा संताप ओढवून घेतला. खुद्द शशी कपूर यांनी एका मुलाखतीत याबाबत सांगितले होते. हा चित्रपट होता, ‘त्रिशूल’. यश चोप्रांना ‘त्रिशूल’साठी एका नव्या चेह-याचा शोध होता. त्यांचा हा शोध पूनम ढिल्लनपाशी येऊन थांबला. पूनम त्यावेळी कॉलेजात शिकत होती. तिला चित्रपटात काम करण्याचा कुठलाही अनुभव नव्हता. पण यश चोप्रा पुनमच्या सौंदर्यावर इतके भाळले होते की, ‘त्रिशूल’मध्ये त्यांनी तिला संजीव कुमार, शशी कपूर व अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली. या चित्रपटाच्या एका सीनमध्ये शशी कपूर यांना पूनमला थप्पड मारायची होती. यश चोप्रा यांनी अॅक्शन म्हटले आणि शशी यांनी पूनमच्या गालावर जोरदार थप्पड लगावली. शशी कपूर यांना या सीनमध्ये पूनमची खरी प्रतिक्रिया अपेक्षित होती आणि झालेही तसेच. पण या सीननंतर पूनम प्रचंड संतापली. अखेर शशी कपूर यांना तिची माफी मागावी लागली.
चित्रपटांत काम करणे बंद केल्यावर शशी कपूर जणू अज्ञातवासात गेले. एकवेळ अशीही आली की, त्यांची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली. शशी यांचा मुलगा कुणाल याने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. त्यानुसार,६० च्या दशकात शशी यांना काम मिळणे बंद झाले. अशास्थितीत शशी यांना आपली आवडती स्पोर्ट कार विकावी लागली. शशी यांच्या पत्नी जेनिफर यांनाही आपल्या अनेक वस्तू विकाव्या लागल्या. परिणामी अनेक टॉपच्या अभिनेत्रींनी शशी कपूर यांच्यासोबत काम करण्यास नकार देणे सुरु केले. यावेळी अभिनेत्री नंदा यांनी शशींसोबत ‘फुल खिले’ साईन केला. हा चित्रपट सुपरहिट ठरला.