'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना कायमच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी सोनाक्षी सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्याबाबत मुलाखतीत वक्तव्य केलं होतं. काही वर्षांपूर्वी सोनाक्षीला केबीसीमध्ये 'रामायण'बाबत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नव्हतं. त्याबाबत मुकेश खन्ना यांनी मुलाखतीत तिच्या संस्कारावर भाष्य केलं होतं. त्यानंतर अभिनेत्रीने त्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. आता शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखील मुकेश खन्ना यांना सुनावलं आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी शॉटगनला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांना खडे बोल सुनावले आहेत. "या व्यक्तीला रामायणचा तज्ञ होण्याचा अधिकार आहे का? आणि याला हिंदू धर्माचा रक्षक कोणी बनवलं? सोनाक्षी एक अशी मुलगी आहे जिच्यावर एका वडिलाला गर्व होईल. रामायणबाबत विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर आलं नाही. याचा अर्थ असा होत नाही की ती चांगली हिंदू नाही. याशिवाय तिला कोणाच्याही सर्टफिकेटची गरज नाही", असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
काय म्हणाले होते मुकेश खन्ना?
मुकेश खन्ना यांनी सिद्धार्थ कननला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी शक्तिमान हे आजच्या पिढीसाठी किती महत्त्वाचा आहे, याबाबत बोलताना सोनाक्षीचं उदाहरण दिलं होतं. ते म्हणाले, "आजच्या पिढीला फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये रस आहे. एका मुलीला भगवान हनुमानाने संजीवनी बुटी कुणासाठी आणली होती, हेदेखील माहीत नव्हतं. हे त्या मुलीच्या संस्कारांमुळे झालं आहे. तिच्या वडिलांचे नाव शत्रुघ्न सिन्हा आहे तिच्या भावांची नावे लव आणि कुश आहेत तरी तिला रामायणाबद्दल नीट माहिती नाही. पण मी म्हणेन की यात तिच्या वडिलांची चूक आहे. त्यांनी त्यांच्या मुलांना हे का शिकवलं नाही? ते इतके आधुनिक का झाले? जर मी आज शक्तिमान असतो, तर मी मुलांना बसवून भारतीय संस्कृती आणि सनातन धर्म शिकवला असता.”
सोनाक्षी सिन्हाने दिलेलं उत्तर
तुम्हाला देखील भगवान राम यांनी दिलेल्या शिकवणीचा विसर पडला आहे. जर राम मंथराला माफ करू शकतो, कैकयीला माफ करू शकतो, एवढ्या मोठ्या युद्धानंतर जर तो रावणाला माफ करू शकतो...तर या गोष्टींच्या तुलनेत अगदी छोटी असलेली ही गोष्ट तुम्ही सोडू शकला असता. तुम्ही मला माफ करावं, अशी माझी इच्छा नाही. पण, तुम्ही हे आता विसरा. आणि शेवटचं म्हणजे पुढच्या वेळी माझ्या वडिलांनी मला काय शिकवण दिली याबाबत बोलायचं असेल तर हे विसरू नका की हे त्यांचेच संस्कार आहेत. ज्यामुळे तुम्ही माझ्या संस्काराबद्दल बोलल्यानंतरही मी एवढ्या आदरपूर्वक हे बोलत आहे.