बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अलिकडेच विवाहबंधनात अडकली. सोनाक्षीने २३ जूनला जहीर इक्बालशी विवाह करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. हिंदू-मुस्लीम विवाहामुळे सोनाक्षीला ट्रोल करण्यात आलं होतं. सोनाक्षीच्या लग्नामुळे कुटुंबीयदेखील खूश नसल्याचं म्हणण्यात येत होतं. आता सोनाक्षीला ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. पहिल्यांदा आंतरधर्मीय विवाह झालेला नाही, असं म्हणत त्यांनी ट्रोलर्सला सुनावलं आहे.
सोनाक्षीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी 'टाइम्स नाऊ'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, "यापेक्षा आम्ही खूप मोठ्या संकंटांचा सामना केलेला आहे. हे त्याच्यासमोर काहीच नाही. यात काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आम्ही नॉर्मल कुटुंबाप्रमाणेच लग्नात सामील झालो होतो". सोनाक्षीच्या लग्नात लेक लव उपस्थित नव्हता. याबाबतही त्यांनी भाष्य केलं. "मला वाटतं कुटुंबातील गोष्टी या कुटुंबातच राहिल्या पाहिजेत. प्रत्येक कुटुंबात मतभेद असतात. काही गोष्टींवरून वादही होतात. पण, शेवटी आम्ही एक कुटुंब आहोत. आणि आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही", असं ते म्हणाले.
लेकीच्या आंतरधर्मीय विवाहावरुन ट्रोल करणाऱ्यांनाही त्यांनी चांगलंच सुनावलं आहे. "आम्हाला एवढं अटेंशन का मिळत आहे, हे तुम्हाला देखील माहीत आहे. पहिल्यांदाच आंतरधर्मीय विवाह झालेला नाही. माझ्या कुटुंबाबत काहीही चुकीचं बोललेलं मी खपवून घेणार नाही. एक वडील म्हणून मी माझ्या मुलीच्या आनंदात सहभागी आहे. तिचा आनंद तोच आमचा आनंद आहे. तिला आनंदी पाहून आम्हाला आनंद मिळत आहे. जहीर तिला खूश ठेवेल याचा विश्वास आहे", असंही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
दरम्यान, सोनाक्षी आणि जहीर गेल्या ७ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. लग्न करत त्यांनी आयुष्यभर एकमेकांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. रजिस्टर पद्धतीने सोनाक्षी आणि जहीर लग्नाच्या बेडीत अडकले. त्यानंतर त्यांचं ग्रँड रिसेप्शन पार पडलं. याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते.