शीना बोरा हत्याकांड सर्वांना आठवत असेल. आता या खून प्रकरणातील सर्व गुपिते एक एक करून उलगडणार आहेत. देशाला हादरवून सोडणाऱ्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणावर आता 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी बरीड ट्रूथ' ही वेबसीरिज येत आहे. सीरिजचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. शीना बोराच्या मृत्यूपासून ते इंद्राणीच्या अटकेपर्यंत सर्व काही तपशीलवार दाखवण्यात येणार आहे. प्रदर्शित होताच या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
शीना बोरा हत्याकांडांनंतर एका कुटुंबाच्या गुंतागुंतीच्या नात्याच्या जाळ्यात सारा देश अडकल्यासारखा वाटत होता. शीना बोरा हत्याकांडानंतर अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. या हत्याकांडातील आरोपींशी निगडीत असलेल्या राजकारणी, पोलिस अधिकारी आणि नातेसंबंधाचे जाळे समोर आलं. हे प्रकरण संजय सिंह यांनी कव्हर केलं होतं. त्यांनी यावर 'एक थी शीना बोरा' पुस्तकही लिहिलं होतं. याच पुस्तकावर ही सिरीज आधारित असणार आहे.
सध्या इंद्राणी जामिनावर बाहेर आहे. 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी बरीड ट्रूथ' मध्ये मुखर्जी स्वत: तसेच तिचे कुटुंबीय, वकील आणि या प्रकरणाचा पर्दाफाश करणाऱ्या अनुभवी पत्रकारांच्या मुलाखतींचा समावेश असणार आहे. आता प्रेक्षकही ही सीरिज पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या 23 फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रदर्शित होत आहे. सध्या सर्वत्र शीना बोरा हिच्या हत्याकांडाची चर्चा रंगत आहे.