गुंजा आणि चंदन यांच्या निखळ अभिनयाने सजलेला ‘नदियाँ के पार’ हा सिनेमा कोण विसरू शकेल. हा चित्रपट प्रचंड गाजला. चंदन आणि गुंजाच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या सिनेमातील गुंजा ही भूमिका अभिनेत्री साधना सिंह हिने साकारली होती. खरे तर साधना तिच्या बहिणीसोबत शूटिंग पाहण्यासाठी गेली होती. पण गर्दीत शूटींग पाहत असतानाच सूरज बडजात्या यांची नजर तिच्यावर पडली आणि ‘नदियाँ के पार’ला गुंजा मिळाली. सन 1982 मध्ये ‘नदियाँ के पार’ हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकला होता. यानंतर साधना सिंह यांनी पिया मिलन, ससुराल, फलक,पापी संसार अशा विविध सिनेमात भूमिका साकारल्या. मात्र अचानक त्या या चंदेरी दुनियापासून दूर गेल्या आणि संसारात रमल्या. पण आज आम्ही साधनाबद्दल नाही तर त्यांच्या मुलीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. साधना सिंह यांची मुलगी शीना शाहाबादी ही सुद्धा एक अभिनेत्री आहे.
साधना यांनी स्वत: मुलीला अभिनयातील बारकावे शिकवले. 2009 मध्ये ‘तेरे संग’ या चित्रपटाद्वारे शीनाने अॅक्टिंग करिअर सुरु केले. पण हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.
यानंतर ती जॉन अब्राहम स्टारर ‘आय, मी और मैं’ या चित्रपटात झळकली. पुढे तिने जवळपास डझनभर सिनेमे केलेत. पण यातला एकही चित्रपट तिला म्हणावे तसे यश देऊ शकला नाही. साहजिकच बॉलिवूडमधून आॅफर्स मिळणे बंद झाले आणि शीनाने साऊथकडे मोर्चा वळवला.
डझनभर चित्रपटांत काम करूनही शीनाला फार कमी लोक ओळखतात. चित्रपटांत येण्यापूर्वीच तिने लग्न केले होते. पण हे लग्न अपयशी ठरले. दोनच महिन्यांत तिचा घटस्फोट झाला. पहिला चित्रपट रिलीज झाल्यानंतर बरोबर महिनाभराने शीनाचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते.
यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांच्या तपासात शीनाच्या पूर्वाश्रमीच्या पतीनेच आपल्या एका मित्राच्या मदतीने तिचे हे फोटो लीक केल्याचे समोर आले होते.