प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खान (Sheezan Khan) वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तुनिषा आत्महत्या प्रकरणातील अटक झालेला मुख्य आरोपी शिझान खान याला जामीन मंजूर झाला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून शिझान ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. विशेष म्हणजे जामीन मंजूर झाल्यानंतर बाहेर आलेला शिझान पूर्वीसारखं आनंदी जीवन जगत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अनेकांनी याच शिझानवर तू प्रेम केलं होतंस का तुनिषा, असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या सोशल मीडियावर शिझानचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या कुटुंबासोबत दिसत असून मज्जामस्ती करताना दिसत आहे. हा फोटो त्याची बहीण शफक नाज हिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा फोटो शेअर करत शांती... असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. मात्र, हा फोटो पाहिल्यावर नेटकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळला असून अनेकांनी शिझानला ट्रोल केलं आहे.
फोटो पाहिल्यानंतर अनेक जण शिझान याला ट्रोल करत आहेत. फोटोवर एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘तुनिषा तू या माणसासाठी स्वतःला संपवलं.’ असे अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तुनिषाच्या आत्महत्येवर दुःख तर, शिझान आणि त्याच्या कुटुंबावर संताप व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र शिझानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'हाच का तो शिझान ज्याच्यासाठी तू जीव गमावलास?', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'याच्यासाठी तू जीव दिलास?' असाही प्रश्न एका युजरने उपस्थित केला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
अली बाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेच्या सेटवर अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली. तुनिषाने शिझान खानच्या मेकअप रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाच्या निधनानंतर तिच्या आईने शिझानवर अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर शिझान जवळपास ७० दिवस तुरुंगात होता.