Singer Sheil Sagar passes away: आधी सिंगर-रॅपर सिद्धू मूसेवालाची गोळ्या झाडून हत्या झाली. यानंतर बॉलिवूडचा लोकप्रिय गायक KK उर्फ कृष्णकुमार कुन्नथ याची हृदयविकाराच्या झटक्यानं प्राणज्योत मालवली. या दोन्ही गायकाच्या निधनाच्या दु:खातून म्युझिक इंडस्ट्री सावरत नाही तोच इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बुधवारी दिल्लीत राहणारा 22 वर्षाचा गायक व संगीतकार शैल सागर (Sheil Sagar ) याचं निधन झालं.
अद्याप त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. दिल्लीत राहणाऱ्या संगीत क्षेत्रातील काही लोकांनी त्याच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या मित्रांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
शैलने 2021 साली‘इफ आय ट्राइड’ या गाण्यापासून करिअरची सुरुवात केली. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्याचं खूप कौतुक केलं गेलं. या गाण्यामुळे तो लोकप्रिय झाला होता. पियानो, गिटार व सेक्सोफोन अशी अनेक वाद्य तो वाजवायचा. तो हंसराज कॉलेजच्या म्युझिक सोसायटीचा माजी उपाध्यक्ष होता.
गेल्या वर्षी शैलचे तीन अन्य अल्बम रिलीज झाले होते. ज्यात बिफोर इट गोज, स्टिल आणि मिस्टर मोबाइल मॅन- लाइव यांचा समावेश आहे. शैल सागरचं मिस्टर मोबाइल मॅन-लाइव हे गाणं गुरुग्रामच्या द पियानो मॅन जॅज क्लबमध्ये रेकॉर्ड करण्यात आलं होतं आणि लाइव शूट केलं होतं. शैलच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्याच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे.
2022 या वर्षात संगीतक्षेत्रातील अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला. शैलच्या मृत्यूच्या तीन दिवस आधी केके हे जग सोडून गेला. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. केकेच्या मूत्यच्या दोन दिवस आधी पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची हत्या झाली होती. त्याआधी गेल्या 10 मे रोजी संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांची प्राणज्योत मालवली. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात सिंगर व कम्पोझर बप्पी लहरी आपल्याला सोडून गेले. त्याआधी 6 फेब्रुवारीला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला.