‘बाहुबली’ (Baahubali) या सिनेमाचं नाव घेतलं तरी ‘स्वप्नवत’ असा एकच शब्द आठवतो. दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला आणि सुपरस्टार प्रभासच्या अभिनयानं सजलेल्या या चित्रपटानं सर्वांना अक्षरश: वेड लावलं. उत्कृष्ट कथानक, तितकाच उत्कृष्ट अभिनय आणि तितकंच उत्कृष्ट निर्मिती मूल्य असलेला हा सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरला. आता हा सिनेमा तुम्हाला तुमच्या मराठी मायबोलीत पाहायला मिळणार आहे.होय, ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने स्वप्नवत असा हा सिनेमा मराठीत आणण्याचं शिवधनुष्य पेललं आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मराठमोळ्या ‘बाहुबली’ची कलात्मक जबाबदारी स्वीकारली आहे. तर अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी मराठी ‘बाहुबली’तील बाहुबली या पात्राला आपला आवाज दिला आहे.
देवसेनेच्या पात्राला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा आवाज आहे. गश्मीर महाजनी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, कौशल इनामदार, आदर्श शिंदे, बेला शेंडे यासारखे अनेक नामवंत कलाकारांनी या चित्रपटासाठी योगदान दिलं आहे.मराठमोळ्या ‘बाहुबली’चे लेखन स्रेहल तरडे यांनी केलं आहे. मेघना एरंडे-शिवगामी, भल्लाल देव-गश्मीर महाजनी, कटप्पा-उदय सबनीस तर अवंतिका या व्यक्तिरेखेला संस्कृती बालगुडे हिचा आवाज असणार आहे.कौशल इनामदार यांनी मराठमोळ्या ‘बाहुबली’चे संगीत दिग्दर्शन केले असून गीतलेखन वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे यांनी केले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हृषिकेश रानडे, हंसिका अय्यर, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, मुग्धा कºहाडे यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे.आता हा मराठी ‘बाहुबली’कशी पाहायला मिळणार तर दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच, गुरुवार 4 नोव्हेंबरला दुपारी 12.00 आणि सायंकाळी 7.00 या वेळेत. ‘शेमारू मराठीबाणा वाहिनी’ वर प्रेक्षकांना मराठी बाहुबली प्रसारित होणार आहे.