Join us

'श्श्…! काळीज धडधडत नाहीए.. कुणी तरी येतंय', नेहा पेंडसेची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 5:45 PM

अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मीडियावरील तिच्या लेटेस्ट पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते. सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळेही ती बऱ्याचदा चर्चेत येत असते. मात्र आतादेखील ती सोशल मीडियावरील तिच्या लेटेस्ट पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

नेहा पेंडसे हिने इंस्टाग्रामवर तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. तिने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले की, श्श्…! काळीज धडधडत नाहीए.. कुणी तरी येतंय. 'रावसाहेब'.दिग्दर्शक : निखिल महाजन, लेखक : प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन निर्मिती : प्लॅनेट मराठी, अक्षय विलास बर्दापूरकर, नेहा पेंडसे-बायस, जितेंद्र जोशी, निखिल महाजन.

नेहा पेंडसे हिने शेअर केलेल्या रावसाहेबच्या पोस्टरवर वन्य प्राण्यांचे चित्र पहायला मिळत आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाचे कथानक आणि यात कोण-कोण कलाकार असणार आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.

अक्षय विलास बर्दापूरकर व प्लॅनेट मराठी एस. एस. प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत 'रावसाहेब' या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले असून हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, आणि निखिल महाजन यांनी केले आहे.  या चित्रपटाची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर, नेहा पेंडसे बायस, जितेंद्र जोशी आणि निखिल महाजन यांनी केली आहे. 

या चित्रपटाविषयी अक्षय बर्दापूरकर म्हणाले, ''निखिल सोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाल्याने मला अत्यंत आनंद होतोय. आमची मैत्री फार जुनी असून मी निखिलचे काम खूप जवळून पाहिले आहे. निखिल एक उत्तम दिग्दर्शक आहे. वेगवेगळे, संवेदनशील विषय अतिशय उत्तमरित्या हाताळण्याची कला त्याला अवगत आहे.'' 

तर निखिल महाजनने सांगितले की,''आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'रावसाहेब'चे टीझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, यापेक्षा मोठी भेटवस्तू असूच शकत नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या सगळ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळतेय, हेच खूप मोलाचे आहे आणि  या चित्रपटाविषयी मी आत्ताच काही सांगणार नाही. मात्र हा विषयही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल हे नक्की!''

टॅग्स :नेहा पेंडसेजितेंद्र जोशी