Tunisha Sharma: अलीबाबा मालिकेतून शिजानची हकालपट्टी निश्चित, तुनिषाला रिप्लेस कोण करणार? अशी आहे चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 03:15 PM2022-12-28T15:15:21+5:302022-12-28T15:16:13+5:30
Tunisha Sharma: तुनिषा आणि शिजान हे या मालिकेमधील प्रमुख कलाकार होते. तुनिषा ही हे जग सोडून गेली आहे. तर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिजान याला अटक करण्यात आली आहे. अलीबाबा: दास्तां-ए-काबुल ही मालिकाही मोठ्या अडचणीत सापडली आहे.
अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्या प्रकरणामुळे मनोरंजन जगतामध्ये खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूमुळे तिच्या निकटवर्तियांना मोठा धक्का बसला आहे. तुनिषावर अंत्यसंस्कार झाले आहेत. तसेच सर्वजण या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या भावनिक नुकसानाबरोबरच अलीबाबा: दास्तां-ए-काबुल ही मालिकाही मोठ्या अडचणीत सापडली आहे.
तुनिषा आणि शिजान हे या मालिकेमधील प्रमुख कलाकार होते. तुनिषा ही हे जग सोडून गेली आहे. तर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिजान याला अटक करण्यात आली आहे. याचा फटका अलीबाबा या मालिकेला बसणे साहजिकच होते. दरम्यान, आता अलीबाबा: दास्तां-ए-काबुल या मालिकेचं काय होणार? ही मालिका पुढे कशी चालणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अलीबाबा ही टेलिव्हिजनवरील सर्वाधिक बजेट असलेली मालिका आहे, असा दावा करत ही मालिका लॉन्च करण्यात आली होती. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरली होती. मात्र अचानक घडलेल्या धक्कादायक प्रकाराने सर्व काही बदलून टाकले आहे. या मालिकेत शिजान अलीबाबा आणि तुनिषा राजकुमारीची भूमिका करत होती.
आता घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर कुठलेही पात्र तडकाफडकी बदलणे शक्य झाले नसते. त्यामुळे निर्मात्यांनी अलीबाबा मालिकेचं पहिलं सत्र ऑफ एअर करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीबाबा मालिकेचे काही भाग बँक करण्यात आले होते. त्यावरून पुढचे काही दिवस ही मालिका चालवली जाईल. जेवढे भाग चित्रित झालेले आहेत तेवढे भार ऑन एअर केले जातील. त्यानंतर मालिकेचे प्रसारण थांबवले जाईल. काही काळ ब्रेक घेतल्यानंतर अलीबाबा मालिका दुसऱ्या सत्रासह पुनरागमन करेल. त्यामध्ये तुम्हाला नवे चेहरे पाहण्यास मिळतील. नसेच नव्या प्रमुख कलाकारांसह ही मालिका पुन्हा सुरू होईल.
तुनिषा शर्मा हिने अलीबाबा मालिकेच्या सेटवर असलेल्या मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे मालिकेशी संबंधित असलेल्यांना मोठा धक्का बसला होता. तसेच सेटवरही भीतीचे वातावरण होते.