पोर्नोग्राफी प्रकरणी पती राज कुंद्राला (Raj Kundra) अटक झाली आणि आता याचा थेट परिणाम शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) करिअर होताना दिसतोय. शुक्रवारी क्राइम ब्रँचने जुहू येथील राज आणि शिल्पाच्या घरी धाड टाकली. त्यावेळी शिल्पाची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान शिल्पाला अनेकदा रडू कोसळलं. या प्रकणानंतर आपली प्रतिमा फारच खराब झाल्याचं शिल्पा म्हणाली. अनेक मोठ्या ब्रँड्सच्या जाहिराती हातून गेल्याचंही शिल्पा म्हणाली. आता काय तर ‘सुपर डान्सर 4’ हा (Super Dancer Chapter 4) शो सुद्धा शिल्पाच्या हातून जातो की काय असं वाटू लागलंय.
गेल्या आठवड्यात शिल्पा या शोमध्ये गैरहजर दिसली. तिच्याजागी करिश्मा कपूर जज बनून आली. आता येत्या आठवड्यातही शिल्पाच्या जागी अन्य सेलिब्रिटी जोडी हजेरी लावणार असल्याचे कळतेय. होय, येत्या आठवड्यात रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसुजा (Genelia D’souza) हे कपल हा शो जज करताना दिसणार आहे.
संबंधित सुत्रांनी ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या वृत्तानुसार, रितेश आणि जेनेलिया यांना निर्मात्यांनी शोसाठी संपर्क साधला आणि दोघांनीही क्षणात होकार कळवला. आज रितेश व जेनेलियासोबत शोचं शूटींग होणार आहे. रितेश व जेनेलियाचा एक मोठा चाहता वर्ग आहे. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. अशात या सुपर क्युट कपलसोबत या आठवड्याचा सुपर डान्सर 4 चा एपिसोड धम्माल रंगणार, हे सांगायला नकोच.
शिल्पा परतणार का? चर्चा खरी मानाल तर, राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा घराबाहेर पडलेली नाही. सोनी टीव्हीसोबतही तिनं कुठलाही संपर्क केलेला नाही. त्यामुळे ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत चॅनलनं पाहुण्या कलाकारांसोबत शो पुढं चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.पती राज कुंद्राच्या अटकेनंतर सुपर डान्सरच्या या सीझनमध्ये तरी शिल्पा शेट्टी परतेल याची शक्यता कमी आहे. कदाचित आता थेट शोच्या पुढच्या सीझनमध्येच ती वापसी करेल.