शिल्पा शेट्टीसुपर डान्सर या कार्यक्रमाचे परीक्षक असताना तिने तिच्या आयुष्याविषयी खूप खास गोष्ट सांगितली होती. ती तिच्या आईच्या गर्भात असताना हे बाळ वाचणारच नाही आणि वाचले तर ते ॲबनॉर्मल असेल असे डॉक्टरांनी सांगितले होते. पण तरीही शिल्पाची आई सुनंदा शेट्टी यांनी या बाळाला म्हणजेच शिल्पाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता.
शिल्पाने सुपर डान्सरमध्ये सांगितले होते की, माझ्यावेळी माझी आई प्रेग्नंट असताना तिला खूपच त्रास होत होता. त्यामुळे हे मूल वाचणार नाही असे डॉक्टरांनी तिला स्पष्टपणे सांगितले होते. एवढेच नव्हे तर हे बाळ जिवंत राहिले तर हे बाळ नॉर्मल नसेल असे देखील सांगण्यात आले होते. पण तरीही माझ्या आईने तिच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण निर्णय घेतला.
काहीही झाले तरी मी या बाळाला जन्म देणारच असे तिने ठरवले. तिच्याच या विश्वासामुळे डॉक्टरांची अनुमती नसताना देखील तिने मला जन्म दिला. मी या स्थितीत देखील वाचले तर मी बॉर्न सर्व्हायव्हर असेल असे तिचे म्हणणे होते.
शिल्पा शेट्टीने बाजीगर या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिने त्यानंतर एकाहून एक हिट चित्रपट दिले. तिने धडकन, रिश्ते, गर्व, मैं खिलाडी तू अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने मोठ्या पडद्यानंतर छोट्या पडद्यावर देखील तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. सुपर डान्सरमधील सुपर से उपर बोलण्याची तिची अदा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या कार्यक्रमाचा तिसरा सिझन नुकताच संपला आहे. या कार्यक्रमातील तिचा अंदाज तिच्या प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.
शिल्पा गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. दरम्यानच्या काळात दोस्ताना यांसारख्या काही चित्रपटात ती आयटम साँगवर थिरकली होती. पण २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या लाईफ इन मेट्रो आणि अपने चित्रपटानंतर ती कोणत्याच चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली नव्हती. पण ती लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.