Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी' चा पाचवा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या सीझनमध्ये सुरुवातीपासूनच घरातील सदस्यांकडून दिग्गज अभिनेत्री असलेल्या वर्षा उसगांवकर आणि पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे (Paddy Kamble) यांचा वारंवार अपमान होतोय. वर्षा आणि पॅडी कांबळेशी बोलताना निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांची जीभ घसरली. यावर नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर आता आता बिग 'बिग बॉस मराठी 2'चा विजेता शिव ठाकरेने (Shiv Thakare) पोस्ट लिहिली आहे.
शिवने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहलं, "आपल्याला फक्त मराठी बोलता येते म्हणजे आपण मराठी नाही होत. आपले ते मराठी संस्कार आहे, ह्या मातीतले जे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या आई-वडिलांकडून लहानपणापासून घेतलेले आहे आणि मला अभिमान आहे ह्या गोष्टीचा. आणि, जेव्हा आपण एखाद्या मोठ्या रियालिटी शोमध्ये एक स्पर्धक म्हणून जातो. तेव्हा तुम्ही जिंकून नाही आला तरी चालतं, पण एक माणूस म्हणून जरी बाहेर आलात तरी तुम्ही जिंकलात"
पुढे तो म्हणाला, "जर तुम्ही हे नाही करू शकलात तर तुम्हाला नाही माहिती की यामुळे तुमचे किती वर्षांची मेहनत वाया जाते. आणि राहिली गोष्ट पॅडी दादा, वर्षा मॅम ह्यासारख्या कलाकारांबद्दल आपण बिग बॉसला धन्यवाद म्हणायला पाहिजे की अशा कलाकारांचा सहवास आपल्याला भेटतो. रंगभूमीवर जेव्हा हे उभे असतात, तेव्हा आपण त्यांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू नाही शकत. अभिनयाने रंगभूमी गाजवलेल्या एका कलाकारावर अशा प्रकारची टिप्पणी करतो. तेव्हा ते खेदजनक वाटतं. फक्त थोड्याशा लाईक कमेंट आणि चर्चेत असावं म्हणून अशा गोष्टी करणे पटत नाही. समोरच्यांची इज्जत करा "न की ते मोठे आहेत म्हणून, यासाठी करा की तुम्हाला तसे घरून संस्कार दिलेले आहेत. जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोरया".
'बिग बॉस'च्या घरात काय घडलं?
बिग बॉस मराठीच्या घरात 'सत्याचा पंचनामा' या टास्कच्या ब्रेक दरम्यान जान्हवीने पॅडी कांबळे यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअर अपमानास्पद वक्तव्य केले.जान्हवी रागाच्या भरात मोठ्या आवाजात पॅडी कांबळेला उद्देशून म्हणाली, "पॅडीदादाच्या काहीतरी अंगात घुसलंय. आयुष्यभर ओव्हरअॅक्टिंग करुन करुन दमले. आता तीच ओव्हरअॅक्टिंग घरात दाखवत आहेत." पॅडीने हे ऐकलं. त्याने अंकिताजवळ शांतपणे त्याची बाजू मांडली. पण तो जान्हवीला काही बोलला नाही. पॅडीने ज्या शांतपणे प्रकरण हाताळलं, त्याचं कौतुक होत आहे. तर वाद झाल्यानंतर जान्हवीला आपली चूक लक्षात आली आणि तिनेपॅडी कांबळेची माफी मागितली.