Join us

कधी पानटपरीवर केलं काम, तर कधी विकले फटाके; शिव ठाकरेची Struggle Story

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 10:57 AM

Shiv thakare: आज शिव ठाकरे हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजतंय. मात्र, एक काळ असा होता जेव्हा त्याच्याकडे शिक्षण पूर्ण करण्यासाठीही पैसे नव्हते.

हिंदी रिअॅलिटी शोमध्ये मराठीचा डंका वाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे शिव ठाकरे (shiv thakre). बिग बॉस मराठीचं (bigg boss marathi) जेतेपद पटकावल्यानंतर बिग बॉस १६ (bigg boss 16), खतरों के खिलाडी अशा कितीतरी रिअॅलिटी शोमधून त्याने स्वत: मधील खिलाडूवृत्ती दाखवून दिली. त्यामुळे आज शिव ठाकरे हे नाव मराठीसह हिंदी कलाविश्वालाही नवीन नाही. शिवकडे आज यश, संपत्ती, प्रसिद्धी, स्टारडम सारं काही आहे. परंतु, त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. इथपर्यंत येण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला.

आज शिव ठाकरे हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजतंय. मात्र, एक काळ असा होता जेव्हा त्याच्याकडे शिक्षण पूर्ण करण्यासाठीही पैसे नव्हते. वर्तमानपत्र विकण्यापासून ते पानटपरीवर काम करेपर्यंत त्याने अनेक काम केली. इतकंच नाही तर त्याच्या आईने घर खरेदी करण्यासाठी दागिनेही विकले होते. एका मुलाखतीमध्ये शिवने त्याच्या संघर्ष काळाविषयी भाष्य केलं आहे.

"माझा जन्म ९ सप्टेंबर रोजी अमरावतीमध्ये झाला. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. माझ्या आई-वडिलांनी अगदी शून्यांतून विश्व निर्माण केलं आहे. माझी स्वप्न पूर्ण करता यावीत यासाठी मी लहानपणापासून कमवायला लागलो. माझ्या काकांची वृत्तपत्र एजन्सी होती. त्यामुळे मी तिथे वृत्तपत्र वितरणाचं काम करायचो.सोबतच कधी दिवाळीत फटाके विकले, गणपती बाप्पाच्या मुर्त्या, लक्ष्मीच्या मूर्त्या विकल्या. वडिलांची पानटपरी होती. त्या दुकानावरही बसायचो. पण, या लहान लहान कामातून मी खूप काही शिकलो. त्यामुळे मला स्वत:वर इतका विश्वास आहे की मी दगड सुद्धा विकू शकतो", असं शिव म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "मला लहानपणापासून डान्सची आवड त्यामुळे मी माझ्या भावाकडून डान्स शिकलो. पुढे युट्यूब पाहून शिकलो आणि त्यातून पुढे मग डान्सचे कार्यक्रम करत प्रसिद्धी मिळवली. पुढे मी मुलांचे डान्स क्लास घेऊ लागलो.  यातून आलेल्या पैशातून मी बाईक घेतली, कॉलेजची फी भरली."

दरम्यान,शिवने २०१७ मध्ये एमटीव्ही रोडीज रायझिंग या रिअॅलिटी शोमधून त्याच्या टीव्ही करिअरची सुरुवात केली. या शोमध्ये तो उपांत्य फेरीपर्यंत गेला. मात्र, त्यानंतर तो बाद झाला.  परंतु, त्याने प्रयत्न सोडले नाहीत. पुन्हा प्रयत्न केले आणि रोडीजमध्ये बाजी मारली. रोडीज संपल्यानंतर २ वर्षाने तो बिग बॉस मराठीमध्ये झळकला. विशेष म्हणजे बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर त्याला बिग बॉस हिंदीमध्येही जाण्याची संधी मिळाली. परंतु, हिंदी बिग बॉसमध्ये जाण्यासाठी त्याला ६वर्ष वाट पाहावी लागली. बिग बॉस ११ पासून तो ऑडिशन देत होता. परंतु, बिग बॉस १६ मध्ये त्याला प्रवेश मिळाला.

टॅग्स :शीव ठाकरेबिग बॉस मराठीबिग बॉसटेलिव्हिजनसेलिब्रिटी