झी टॉकीजच्या 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर'ची सगळ्यांनाच उत्सुकता असते. असाच एक 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर', येत्या रविवारी, म्हणजेच २४ फेब्रुवारीला झी टॉकीज घेऊन येत आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'मी शिवाजी पार्क' हा थरारपट यादिवशी दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता झी टॉकीजवर पाहता येईल. विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, सतीश आळेकर अशा दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात अनुभवता येईल.
शिवाजी पार्कवर रोज सकाळी भेटणाऱ्या ५ ज्येष्ठ नागरिक, त्यांच्या आयुष्यात अचानक घडलेली एक अप्रिय घटना व त्यामुळे त्यांच्या आयुष्यात घडून आलेले बदल, असे या चित्रपटाचे कथानक आहे. चित्रपट बघत असताना, पुढे काय घडणार याची उत्सुकता सतत लागून राहते. म्हणूनच ही कलाकृती अत्यंत उत्कंठावर्धकदेखील आहे. सिनेमा प्रेक्षकांना उत्तमरीत्या खिळवून ठेवतो. पाच मुख्य कलाकारांसह सुशांत शेलार, रमेश वाणी, उदय टिकेकर, अभिजित साटम, संतोष जुवेकर, शरद पोंक्षे, मधुर वेलणकर, दीप्ती लेले, कलाकारांची मोठी फळी या सिनेमात आहे. याशिवाय, विशेष भूमिकेत सविता मालपेकर, भारती आचरेकर, सुहास जोशी या ज्येष्ठ अभिनेत्री सुद्धा पाहायला मिळतील. एकापेक्षा एक सरस असे कलाकार, इतक्या मोठ्या प्रमाणात एका सिनेमात पाहायला मिळणं, ही प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरेल. या चित्रपटाविषयी सांगताना, दिलीप प्रभावळकर म्हणतात; "सर्व कलाकारांना योग्यरीत्या हाताशी घेऊन, महेश मांजरेकर यांनी अत्यंत समर्थपणे हा चित्रपट बनवला आहे. ज्या शिवाजी पार्कवर, राजकीय भाषणे, क्रिकेटचे सामने अशा गोष्टींचा अनुभव घेतला, तिथे शूटिंग करत असताना खूप मजा आली. हा थरारपट सर्वांनी अवश्य पाहावा."