मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 70 वर्षे पूर्ण केली आहेत. 21 एप्रिल 1950 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला.छोट्या पडद्यावरील गाजलेल्या ‘सीआयडी’ या प्रसिद्ध मालिकेमुळे अभिनेते शिवाजी साटम घराघरांत पोहोचले आहेत. गेल्या 20 वर्षांहून अधिक काळापासून शिवाजी साटम या मालिकेत ‘एसीपी प्रद्युम्न’ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का? यापुर्वी एक बँकेत नोकरी करत होते. नोकरी सांभाळून अभिनयात असलेली आवड म्हणून अभिनय क्षेत्रातही काम करत होते.
नोकरी करत असताना अभिनय करणे दोघांचा ताळमेळ साधणे शक्य झाले ते केवळ त्यांच्या बँकेतल्या सहकारी आणि वरिष्ठांमुळेच. त्यांनी ख-या अर्थाने त्यांना समजून घेतले. शूटिंग अटोपल्यानंतर शिवाजी साटम बँकेतील काम पूर्ण करत. यावरही कधीच कोणीही या गोष्टीवर आक्षेप घेतला नाही. त्याचमुळे 2000 पर्यंत नोकरी करू शकल्याचे दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते. त्यानंतर शिवाजी साटम यांची पत्नी खूप आजारी पडल्या.
आजारपणामुळे आणि मालिकेच्या शूटिंगमुळे नोकरी करणे शक्यच नव्हते. सतत होत असलेल्या सुट्टयांमुळे बँकेकडून त्यांना नोटीस देण्यात आली होती. अशा सगळ्या परिस्थीतत प्रतंड ओढाताण होत असताना अभिनय करता करता नोकरी सांभाळणे खूप कठिण जायला लागले. शेवटी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि संपूर्ण वेळ अभिनयात दिला.
बी.पी. सिंग यांनी ‘सीआयडी’ कार्यक्रम करण्याच्या तयारीत होते. भूमिकेसाठी कलाकारांचा शोधही तसा सुरुच होता. त्याचवेळी त्यांनी साटम यांना एसीपीच्या भूमिकेसाठी विचारलं होतं. साटम एक शून्य शून्य या मराठी मालिकेत पोलिसाची भूमिका साकारत होते. क्षणाचाही विलंब न लावता साटम यांनी ही ऑफर स्विकारली.ही भूमिका इतकी काही हिट ठरली की, शिवाजी साटम यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले.
आजही सीआयडी नाव घेताच एसीपी प्रद्युमन नाही आठवले तरच नवल. तब्बल 21 वर्षे शिवाजी साटम या मालिकेत ‘एसीपी प्रद्युम्न’ ही व्यक्तिरेखेत झळकले. नोव्हेंबर 2004 मध्ये, या शोचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले.