अभिनेत्री शिवानी सुर्वेला नुकताच व्हिएतनाममध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तिच्या ‘जाना ना दिल से दूर’ ह्या हिंदी मालिकेतल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार संपादन केलेली ती एकमेव मराठी अभिनेत्री आहे. सूत्रांच्या माहितीनूसार, फक्त याच पुरस्कार सोहळ्यात नाही, तर मराठी सिनेसृष्टीतल्या इतर कोणत्याही अभिनेत्रीला आजवर अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आले नाही आहे. त्यामूळे असा नामांकित पुरस्कार मिळवणारी शिवानी एकमेव मराठी अभिनेत्री आहे. आणि एवढ्या लहानवयात हे यश मिळवणं, निश्चितच कौतुकाचे आहे. शिवानीचे व्हिएतनामला विमानतळावरच जंगी स्वागत झाले. यंदा बिग बॉस मराठीमूळे शिवानीचा महाराष्ट्रात खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. पण ‘जाना ना दिल से दूर’ ही मालिका इंडोनेशिया आणि व्हिएतनाममध्ये डब होऊन प्रसारित झाल्यापासून आंतरराष्ट्रीय पातळीवरही शिवानीची चांगलीच फॅनफॉलोविंग आहे.
अभिनेत्री शिवानी सुर्वे ह्याविषयी सांगते, “व्हिएतनाममध्ये पाऊल ठेवल्यापासून मला भरभरून प्रेम मिळाले. तिथली माझी फॅनफॉलोविंग पाहून मी खूप भारावून गेले. ‘जाना ना दिल से दूर’ इथे खूप लोकप्रिय मालिका असल्याचे मला माहित होते. पण ह्या मालिकेमूळे माझा एवढा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला असेल, हे स्वत: पाहणे, त्यांचे प्रेम अनुभवणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. मला मिळालेले अवॉर्ड हे माझ्या ह्या चाहत्यांच्याच प्रेमाचेच प्रतिक आहे. व्हिएतनामला मी पहिल्यांदाच गेले होते. आणि आता माझ्या चाहत्यांनी तिथली थोडीशी भाषाही शिकवली आहे.”
शिवानी पूढे म्हणते, “2019 हे वर्ष माझ्या करीयरमधले एक माइलस्टोन वर्ष ठरले. बिग बॉसमूळे मी महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचले. रूपेरी पडद्यावर सुपरस्टार अभिनेता अंकुश चौधरीसोबत ‘ट्रिपल सीट’ सिनेमामधून झळकले. आणि आता हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
2019 मूळे मी करीयरच्या एका महत्वाच्या टप्प्यावर मी पोहोचले.” शिवानीचे व्हिएतनामच्या चाहत्यांनीच नाही तर तिथले नामांकित मीडियाहाऊस टूडेच्या संपादकांनीही भरभरून कौतुक केले. ही निश्चितच तिच्यासाठी अभिमानाची बाब आहे.