‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंडने बॉलिवूडचं टेन्शन वाढवलं आहे. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडचा बळी ठरला. अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हा सिनेमाही या ट्रेंडमुळे फ्लॉपच्या रांगेत जाऊन बसला. आता ‘बायकॉट गँग’च्या निशाण्यावर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भटचा (Alia Bhatt) ‘ब्रह्मास्त्र’ आला आहे. रणबीर व आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा सिनेमा उद्या 9 सप्टेंबरला रिलीज होतोय. पण त्याआधी या चित्रपटाला बायकॉट करण्याचा इशारा सोशल मीडियावर दिला जात आहेत. अशात आता शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी या ‘ब्रह्मास्त्र’च्या बाजूने मैदानात उतरल्या आहेत.
काल रणबीर व आलिया व ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जी उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनाला गेले होते. पण बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन करून आलिया व रणबीरचा रस्ता अडवला. यामुळे दोघांनाही मंदिरात दर्शन न घेताच माघारी परतावे लागले. सोशल मीडियावर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही या घटनेचा निषेध नोंदवत, एक ट्वीट केलं आहे. आपल्या या ट्वीटसोबत त्यांनी रणबीर व आलियाचा पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यासोबतचा एक जुना फोटोही शेअर केला आहे. या फोटोला उद्देशून त्यांनी ट्वीट केलं आहे.
काय म्हणाला प्रियंका चतुर्वेदी‘तुम्ही द्वेषाबद्दल मूकदर्शक बनत असाल आणि राजकारणावर बोलणं हे आपलं काम नाही, असं मानत असाल तर हे फोटो सेशन तुमची काहीही मदत करणार नाही. ते तसेही तुमच्या मागे येणारच. उज्जैनच्या महाकाल मंदिरातील विरोध हे त्याचं एक ताजं उदाहरण आहे. राजकीय पूर्वग्रह अशा कुरूप गोष्टींना जन्म देतोय, हे पाहून लाज वाटते,’ असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
आपल्या दुस-या ट्वीटमध्ये त्या लिहितात, ‘प्रत्येक चित्रपटाच्या रिलीजआधी निवडक चित्रपटांना विरोध एक उद्योग झाला आहे. लॉबिंग करुन चित्रपटांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन याला विरोध केला नाही तर आपण वेगाने द्वेष, भय व मौनाच्या दरीकडे ढकलले जाऊ. मनोरंजन उद्योग रोजगार देतो. लाखो लोक यावर अवलंबून आहेत. तेव्हा बोलावं लागेल...’ ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासह बिग बी अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या मुख्य भूमिका आहेत.