ओटीटी प्लॅटफॉर्मवरील रिएलिटी शो बिग बॉस सिजन ३ (Bigg Boss OTT 3) मध्ये अश्लीलता दाखवली जात असून हा शो तातडीने बंद करावा, अशी मागणी शिवसेना सचिव आणि प्रवक्ता आमदार डॉ. मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी मुंबई पोलीस आयुक्त श्री विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे. आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी आज शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
बिग बॉस सिजन ३ मधील १८ जुलै २०२४ रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये कलाकार कॅमेऱ्यासमोर अतिशय बीभत्स आणि किळसवाणे कृत्य करत असल्याचे दाखवल्याचे पोलिस आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले. याच शो दरम्यान अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांनी कलाकारांना कौटुंबिक नात्याच्या सर्व सीमा पार करत सामाजिक मूल्ये पायदळी तुडवली असल्याची टीका डॉ. कायंदे यांनी केली.
डॉ. कायंदे पुढे म्हणाल्या की, बिग बॉस ३ या शोने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लहान मुलंही हा शो पाहतात. अरमान मलिक जे बोलत आहेत त्याचा परिणाम लोकांच्या मनावर होतो. त्यामुळे हा शो तातडीने बंद करावा. या शोचे निर्माते आणि प्रक्षेपण करणाऱ्या कंपनीच्या सीईओंवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी. सदर व्हिडिओ विविध सोशल मीडियावर देखील वायरल झाला आहे का याची तपासणी करावी, हा गुन्हा ज्या ज्या कायद्याखाली येत असेल ते सर्व आयपीसीचे कलम सदर शो मध्ये भाग घेणाऱ्या लोकांवर व शोच्या सीईओवर लावण्यात यावे, अशी लेखी मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
त्याचबरोबर OTT लाही सेन्सॉरच्या कक्षेत आणण्याची मागणी करण्याबाबत केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे डॉ. कायंदे यांनी म्हटले आहे.