सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Chandrakant Desai) यांनी त्यांच्याच कर्जत येथील भव्यदिव्य स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. या वृत्तामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. त्यांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं असेल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान आता नवीन माहिती समोर आली आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी काही व्हॉईस नोट रेकॉर्ड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा ते दिल्लीहून मुंबईला विमानाने आले, त्यानंतर रेकॉर्ड केलेल्या व्हॉईस क्लीपमध्ये चार बिझनेसमनची नावे असल्याचा दावा केला जातोय.
नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी व्हॉईस नोट रेकॉर्ड केल्याची माहिती मिळत आहे. 'एबीपी माझा'च्या रिपोर्टनुसार, या व्हॉईस नोटमध्ये चार बिझनेसमनचा उल्लेख आहे. देसाई काल रात्री दिल्लीहून मुंबईला विमानाने आले. रात्री अडीच वाजता गाडीने ते कर्जतमधील एनडी स्टुडिओला पोहचले. तेव्हाच ते तिथल्या मॅनेजरशी बोलले आणि त्याला म्हणाले की, तुला उद्या सकाळी मी व्हॉईस रेकॉर्डर देतो.
व्हॉईस रेकॉर्डर त्यांच्या मृतदेहाशेजारी होता...
त्यानुसार मॅनेजरने व्हॉईस रेकॉर्डरसाठी नितीन देसाईंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सकाळी मेगाहॉलजवळ नितीन देसाई गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले. त्यावेळी हा व्हॉईस रेकॉर्डर त्यांच्या मृतदेहाशेजारी होता. पोलिसांनी तो ताब्यात घेतला असून तपास सुरु केला आहे. त्यामध्ये काही व्हॉईस नोट असून चार बिझनेसमननी आपल्याला कसे छळले, आर्थिक व्यवहारानंतर कसा दबाव आणला, याबाबत उल्लेख केला आहे.
बिझनेसमनची चौकशी होण्याची शक्यता पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून ऑडिओ क्लीपमध्ये उल्लेख असलेल्या बिझनेसमनची चौकशी होण्याची शक्यता आहे. तपास करुन पोलिस त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मिळते आहे.