बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचाची गेल्या काही दिवसांपासून तब्येत बिघडली होती. मात्र तरीही तिने चित्रीकरणाच्या डेट दिल्यामुळे शूटिंग सुरू ठेवले होते. मात्र शूटिंग सुरू असताना ती अचानक सेटवर कोसळली. तिची तब्येत बिघडल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
नुसरत भरूचाची अचानक तब्बेत बिघडल्यामुळे तिला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ती ‘लव रंजन’ या चित्रपटाचे शूटिंग करत होती. या चित्रपटाच्या शूटिंगबाबत तिने प्रेक्षकांना आणि चाहत्यांना माहिती दिली नव्हती कारण चित्रपटाची अधिकृत घोषण करण्यात आली नव्हती. नुसरतने २३ ते २४ दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. नुसरतची प्रकृती बिघडल्यामुळे सध्या चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.
ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, नुसरतने तिच्या तब्येतीबद्दल सांगितले की, जास्त तणावामुळे मला व्हर्टीगो अटॅक आला, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. कोरोना व्हायरसमुळे शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या त्रास होत आहे.
पुढे तिने सांगितले की, मी चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. त्यावेळी एका हॉस्पिटलमध्ये राहात होते. ते हॉटेल सेटच्या जवळ होते. घरुन प्रवास करण्यास वेळ जात होता. त्यामुळे मी या हॉटेलमध्ये राहात होते. मी जवळपास तीन आठवडे चित्रीकरण केले. मला थकवा जाणवत होता म्हणून मी शूटिंगला सुट्टी घेतली. एक दिवस आराम करुन बरे वाटेल असे वाटत होते. मात्र दुसऱ्या दिवशी माझी प्रकृती जास्त बिघडली. मी सेटवर पोहोचले आणि तब्येत बिघडल्यामुळे खाली कोसळले. मला तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी माझे ब्लडप्रेशर कमी झाले होते.’
नुसरत रुग्णालयात पोहोचेपर्यंत तिचे आई आणि वडील तेथे पोहोचले होते. ‘पुढचे ६ ते ७ दिवस माझ्यासाठी फार कठीण आहेत. मला रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलेले नाही. सध्या डॉक्टरांनी काही औषधे दिली असून मी घरी उपचार घेत आहे. माझी प्रकृती स्थिर आहे असे नुसरत म्हणाली.