भारतरत्न, पद्मश्री(Padma Shri), पद्मभूषण(Padma Bhushan) आणि पद्मविभूषण(Padma Vibhushan) हे आपल्या देशामधील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. काही जणांना राहण्यासाठी नवी दिल्लीत सरकारी निवासस्थानेही देण्यात आली आहेत. परंतु, आता केंद्र सरकारने ही घरं रिकामी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बऱ्याच कलाकारांना बेघर व्हावे लागले आहे. यात ओडिसी नृत्यकलेतील ९१ वर्षीय ज्येष्ठ कलाकार गुरू मायाधर राऊत (Guru Mayadhar Raut) यांचाही समावेश आहे. गुरु मायाधर राऊत यांचे देखील घरातून सामान बाहेर फेकण्यात आले. त्यांमुळे ते बेघर झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. २०१० साली गुरू मायाधर राऊत यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.
गुरू मायाधर राऊत यांचे वय ९१ वर्षे असून १९८० साली त्यांना सरकारी घर मिळाले होते. अनेक कलाकारांना तीन वर्षाच्या कालावधीसाठी अतिशय कमी पैशांमध्ये घर देण्यात आले होते. याबाबत नियमितपणे त्याची मुदत वाढवण्यात आली. मात्र २०१४ सालानंतर ही मुदतवाढ देण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर काही कलाकारांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्याचा निकाल आता आला आणि २ मेपर्यंत घर खाली करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर सामान बाहेर काढण्यात आले. मायाधर यांचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ते मुलीचा आधार घेत बाहेर पडताना दिसत आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाच्या शिफारशीनुसार एका विशेष कोट्यातून ४० कलाकारांना असे घर देण्यात येतात.
गुरू मायाधर राऊत यांची मुलगी आणि ओडिसी नृत्यांगना मधुमिता राऊत (Madhumita Raut) यांनी सरकारवर टीका केली आहे. 'गुरू मायाधर यांनी, सोनल मानसिंग (Sonal Mansingh) आणि राधा रेड्डी (Radha Reddy) यांसारख्या देशातील काही दिग्गज नर्तकांना प्रशिक्षण दिलेले आहे. त्यांनी दिल्लीत ५० वर्षे नृत्य शिकवण्याचे काम केले. त्यांच्या नावे कुठेही एक इंचभर जमीनही नाही. प्रत्येक नागरिकाला सन्मानपूर्वक वागणूक मिळवण्याचा अधिकार आहे. असं असून देखील माझ्या वडिलांसारख्या दिग्गज कलाकाराला अतिशय वाईट वागणूक दिली जात आहे, असे मधुमिता राऊत म्हणाल्या. सध्या मधुमिता राऊत यांनी सर्वोदय एन्क्लेव्हमधील एका तळघरात आपलं आणि वडिलांचं सामान हलवलं आहे. ही जागा त्यांच्या एका विद्यार्थ्याच्या पालकांच्या मालकीची आहे.