नवी दिल्ली - स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं दीर्घ आजारानं अखेर दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले आहे. गेल्या ४० हून अधिक दिवस ते मृत्युशी झुंज देत होते. मात्र ते अपयशी ठरले. बुधवारी सकाळी राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मालावली. राजू श्रीवास्तव यांच्या विनोदी शैलीनं आजवर अनेकांना हसवलं. मात्र त्यांच्या निधनाच्या बातमीनं चाहत्यांचे डोळे पाणावले.
राजू श्रीवास्तव यांच्या जीवनातील अनेक किस्से सांगितले जातात. त्यातील एक म्हणजे एकदा राजू शाळेत गेला होता तेव्हा त्याचा सहकारी संतोष वर्गात गब्बर बनला होता. मैफील जमली होती. संतोष बेल्ट जमीनवर आपटत कितने आदमी थे असं विचारत होता. सगळे पोटधरून हसत होते. तेव्हा राजूनं संतोषला विचारलं तू हे कुठून शिकला? संतोषनं शोले सिनेमा म्हटलं. राजू श्रीवास्तवला सिनेमाबद्दल फारसं काही माहिती नव्हतं. याआधी कधी सिनेमा पाहिला नव्हता. सिनेमा पाहणं म्हणजे दारुचं व्यसन असल्यासारखं राजू यांच्या आईला वाटायचं. हा किस्सा राजू ८ वीच्या वर्गात असतानाचा आहे.
संतोषकडून माहिती घेतल्यानंतर कळालं की तिकीट खरेदी करून कुणीही सिनेमा पाहू शकतो. तिकीटीसाठी १ रुपये ९० पैसे त्यांनी जमवले. एकेदिवशी घरातून शाळेसाठी बाहेर पडले आणि सिनेमा पाहायला गेले. शोले सिनेमा पाहून अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचा प्रचंड परिणाम राजू श्रीवास्तव यांच्यावर झाला. राजू अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करू लागला. हळूहळू राजूची मिमिक्री कला आसपासच्या परिसरात पसरली. ओळखीच्या लोकांनी राजूला अनेकदा अमिताभची मिमिक्री करण्यास सांगितली. ज्यूनियर अमिताभ या नावानं राजूला ओळख मिळाली. राजूच्या आईला हे काही आवडत नसे.
मुंबईला येण्यापूर्वी राजू श्रीवास्तव यांनी कानपूरमध्ये केवळ एक शो केला होता. अनेक ठिकाणी राजू आमंत्रित केल्यावर जायचे. अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करायचे. एकेदिवशी शोसाठी राजूला बोलवण्यात आले. तेव्हा आयोजकाने त्यांच्या खिशात ५० रुपयांची नोट ठेवली. राजू नोट घेऊन घरी परतला. दुसऱ्या दिवशी ५० रुपये आयोजकाला परत देण्यासाठी पोहचले. हे पैसे केवळ ठेवण्यासाठी दिल्याचं राजूला वाटलं. परंतु ते त्याचे पहिले मानधन आहे असं आयोजकांनी सांगितले. तेव्हा पहिल्यांदा राजू यांना कॉमेडी आणि मिमिक्रीच्या माध्यमातून पैसे कमावले जाऊ शकतात हे कळालं.