Join us

म्हणे, ‘शोले’तील ‘जय-वीरू’ सोबत भेदभाव झाला; व्हायरल पोस्ट पाहून जावेद जाफरी भडकला 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 2:39 PM

कुठल्या मार्गाने जातोय आपण? असा संतप्त सवालही जावेद जाफरीने यानिमित्ताने उपस्थित केला आहे.

ठळक मुद्दे  सोशल मीडियावर आणखी  एक व्हायरल होणारी पोस्टही जावेद जाफरीने शेअर केली आहे.

धार्मिक कारणावरून लोकांची माथी भडकवण्याचे प्रकार आपल्या देशात नवे नाहीत. सोशल मीडियाच्या आजच्या काळात असे प्रकार सर्रास सुरू आहेत. धार्मिक तेढ वाढवणारी एखादी पोस्ट व्हायरल होते आणि तणावाचे कारण बनते, अशा घटना अलीकडच्या काळात वाढत आहेत. अशाच एका पोस्टकडे अभिनेता जावेद जाफरीने लक्ष वेधले असून, या माध्यमातून देशातील तणाव वाढवण्याचा प्रयत्न करणा-यांना फटकारले आहे. कुठल्या मार्गाने जातोय आपण? असा संतप्त सवालही जावेद जाफरीने यानिमित्ताने उपस्थित केला आहे.

सध्या ‘शोले’ चित्रपटाचा संदर्भ असलेली एक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.   जावेदने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ही व्हायरल होत असलेली एक पोस्ट शेअर केली आहे. ‘शोले’ चित्रपटात गब्बरने ठाकुरच्या संपूर्ण कुटुंबीयांना मारले तेव्हा संपूर्ण गावकरी शांत राहिले. पण  गब्बरने अब्दुल चाचाच्या मुलाला मारले तेव्हा संपूर्ण गाव मिळून जय आणि वीरुला गावातून बाहेर काढण्यासाठी एकत्र आले, असे या व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे. शिवाय, ‘शोले’ची कथा सलीम- जावेदने लिहिल्याचेही नमूद केले आहे. ‘शोले’च्या कथेच्या आधारावर लोकांची माथी भडकवणा-या या पोस्टवर जावेद जाफरीने कडाडून टीका केली आहे. ही पोस्ट शेअर करताना ‘खरच? आपण कुठल्या मार्गाने निघालो आहोत? आपण इतकी खालची पातळी गाठावी? आपल्याला हवा असलेला भारत देश हाच का? ’ असे जावेदने लिहिले आहे.

 सोशल मीडियावर आणखी  एक व्हायरल होणारी पोस्टही जावेद जाफरीने शेअर केली आहे.  या पोस्टमध्ये अभिनेता फरहान अख्तरच्या आगामी ‘तुफान’ या चित्रपटाला विरोध करण्यात आला आहे. ‘फरहान अख्तरचा ‘तुफान’ हा सिनेमा लवकरच रिलीज होतोय. पण त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी त्याने देशाचे काय नुकसान केले, हा विचार करा. तुमचा पैसा हिंदूविरोधींसाठी खर्च करू नका, असे या पोस्टमध्ये लिहिले आहे. जावेद जाफरीने या पोस्टवरही नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :जावेद जाफरी