Join us

'पूरे पचास हजार...' या शोलेतील एका डायलॉगसाठी सांभानं तब्बल २७ वेळा केला मुंबई ते बंगळुरू प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 7:00 AM

जवळपास तीन तासांच्या 'शोले' (Sholey Movie) चित्रपटात सांभा फक्त एकच डायलॉग बोलले होते आणि हा डायलॉग होता पूरे पचास हजार.

७०च्या दशकातील सुपरहिट चित्रपट 'शोले' (Sholey) मधील सांभाच्या भूमिकेतून अभिनेते मॅक मोहन (Mac Mohan) यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटविली होती. या भूमिकेनंतर ते सांभाच्या नावाने ओळखू लागले होते. मॅक यांनी सिनेमात कधीच मुख्य भूमिका केली नाही परंतु ते बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटात झळकले. 

मॅक मोहन यांनी बॉलिवूडमधील सर्व स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे. जवळपास तीन तासांच्या शोले चित्रपटात सांभा फक्त एकच डायलॉग बोलले होते आणि हा डायलॉग होता पूरे पचास हजार. या एका डायलॉगमुळे ते जगभरात लोकप्रिय झाले होते. या डायलॉगच्या मागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे.  या एका डायलॉगच्या शूटिंगसाठी मॅक मोहन यांनी मुंबई ते बंगळुरू असा २७ वेळा प्रवास केला होता. सुरूवातीला चित्रपटात त्यांची भूमिका मोठी होती. मात्र चित्रपटाचे एडिटिंग झाल्यानंतर त्यांचा फक्त एकच डायलॉग होता.

मॅक मोहन शोलेचे एडिटिंग झाल्यानंतर चित्रपट पाहून निराश झाले होते. एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितले होते की, जेव्हा मी सिनेमा पाहिला तेव्हा मी रडू लागलो. मी थेट दिग्दर्शक रमेश सिप्पींकडे गेलो आणि त्यांना म्हणालो की माझी एवढी छोटीच भूमिका का ठेवली? तुम्हाला हवे होते तर हटवून टाकायचे. तेव्हा ते म्हणाले की, जर चित्रपट हिट झाला तर जग तुला सांभा या नावाने ओळखतील आणि असेच घडले.

१९६४ साली मॅक मोहन यांनी हकीकत या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ४६ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास १७५ चित्रपटात काम केले होते. ते अतिथी तुम कब जाओगेचे चित्रीकरण करत होते तेव्हा त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या फुफ्फुसात ट्युमर आहे. त्यानंतर त्यांच्यावर खूप उपचार झाले पण १० मे, २०१० रोजी त्यांचे निधन झाले.

टॅग्स :मॅक मोहन