नृत्य दिग्दर्शन म्हणजेच कोरिओग्राफी हे कोणत्याही कलाकृतीचे महत्त्वाचे अंग मानले जाते. एखादे सुरेल गाणे नेत्रसुखद बनवण्यात कोरिओग्राफी महत्त्वाची भूमिका बजावते. मराठीतील आघाडीच्या कोरिओग्राफर्सपैकी एक असलेल्या अमित बाईंग या कोरिओग्राफरने आजवर मराठी-हिंदीतील बऱ्याच कलाकारांना आपल्या तालावर नाचवले आहे. अभिनेता श्रेयस तळपदेच्या 'चल भावा सिटीत' या नवीन कार्यक्रमाचे 'सिटीत गाव गाजतंय...' हे शीर्षकगीत सध्या खूप गाजत आहे. या गाण्याची कोरिओग्राफीही अमित बाईंगने केली आहे.
२०१९मध्ये 'अगं बाई सासूबाई' मालिकेच्या गाण्याची कोरिओग्राफी करताच कोरिओग्राफर अमित बाईंग हे नाव झी मराठी वाहिनीसोबत जोडले गेले. त्यानंतर या वाहिनीसाठी त्याने २५-३० गाणी केली. याखेरीज कलर्स मराठीसाठी 'बिग बाॅस मराठी १-२' आणि सोनी मराठी वाहिनीसाठीही अमितने गाणी केली आहेत. 'सिटीत गाव गाजतंय' हे अमितने श्रेयससाठी कोरिओग्राफ केलेले दुसरे गाणे आहे. सर्वप्रथम 'माझी तुझी रेशीमगाठ' या गाण्यासाठी अमितने श्रेयससोबत काम केले होते. आता 'सिटीत गाव गाजतंय' हे अमित आणि श्रेयस या जोडीचे दुसरे गाणे धुमाकूळ घालत आहे.
वर्कफ्रंट'कॅनव्हास' या मराठी चित्रपटाद्वारे अमित सिनेसृष्टीकडे वळला. त्यानंतर तिग्मांशु धुलिया यांच्या 'साहिब बीवी और गँगस्टर' चित्रपटासाठी कोरिओग्राफी करत अमितने हिंदीत झेप घेतली. दरम्यानच्या काळात सयाजी शिंदे-मकरंद अनासपुरेंचा 'पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा', लक्ष्मण उतेकरांचा 'लालबागची राणी', अजय फणसेकरांचा 'चीटर', आदित्य सरपोतदारांचा 'उनाड' आदी बऱ्याच चित्रपटांची कोरिओग्राफी अमितने केली. मराठी-हिंदी चित्रपटांसोबतच अमितने गुजराती चित्रपट, पंजाबी गाणी आणि म्युझिक व्हिडिओजचीही कोरिओग्राफी केली आहे. यात जावेद अलीच्या म्युझिक व्हिडिओचाही समावेश आहे. एबी एन्टरटेन्मेंट प्रोडक्शन या स्वत:च्या निर्मिती संस्थेत अमितने चार गाणी, तसेच 'मुंबई १६' आणि 'बागुलबुवा' या दोन लघुपटांची निर्मितीही केली आहे.