मराठी तसंच बॉलिवूडमध्ये नाव कमावणारा अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता श्रेयस हळूहळू बरा होत आहे. मात्र वयाच्या केवळ 47 व्या वर्षी श्रेयसला हार्टअॅटॅक आल्याने सर्वांनीच चिंता व्यक्त केली. श्रेयस सध्या घरीच असून कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. तसंच स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकत याची जाणीव झाल्याचंही त्याने एका मुलाखतीत सांगितलं.
नुकतीच श्रेयसने बॉम्बे टाईम्सला मुलाखत दिली. यामध्ये त्याने स्वत:च्या तब्येतीविषयी अपडेट दिले. तसंच या प्रसंगातून आपण तब्येतीकडे किती दुर्लक्ष करतो याची जाणीव झाल्याचेही सांगितले. श्रेयस म्हणाला, "मी याआधी कधीच रुग्णालयात अॅडमिट झालेलो नाही. अगदी फ्रॅक्चरसाठीही नाही. त्यामुळे मला असं काही होईल याची कल्पनाच नव्हती. आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्या. जान है तो जहाँ है . अशी घटना आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलते.गेल्या २८ वर्षांपासून मी माझ्या फिल्मी करिअरवर लक्ष देत आहे. यामध्ये आपण कुटुंबालाही गांभीर्याने घेत नाही. पण वेळीच प्रकिबंधात्मक काळजी घेण्याची गरज असते."
मला दुसरं आयुष्यच मिळालं
श्रेयस पुढे म्हणाला, "वैद्यकीयदृष्ट्या मी जीवंत नव्हतो. तो प्रचंड मोठा धक्का होता. डॉक्टरांनी मला CPR, इलेक्ट्रिक शॉक दिला म्हणून माझे प्राण वाचले. मला दुसरं आयुष्यच मिळालं आहे. माझा जीव वाचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे मी कोणत्या शब्दात आभार मानू खरंच कळत नाही. माझी सुपरवुमन माझी पत्नी तिने सर्वतोपरी प्रयत्न केले. तिच्यामुळेच आज मी तुमच्यासमोर आहे."
एक एक दिवस जगत आहे
श्रेयस म्हणाला, "मी शुद्धीत आल्यानंतर डॉक्टरांकडे पाहून हसलो. अशा कठीण प्रसंगासाठी पत्नीची माफीही मागितली. मी पाच दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली होतो. आता मी प्रत्येक दिवस जगत आहे. डॉक्टरांनी सहा आठवड्यांनंतर काम सुरु करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या मी कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. जेव्हा अशी घटना घडते तेव्हा तो तुमच्या कुटुंबावर झालेला आघात असतो. "