कंगना राणौत अभिनीत आणि दिग्दर्शित 'इमरजेंसी' चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...
- तेजल गावडे
: 'इमरजेंसी' सिनेमात तू दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारतो आहेस, काय सांगशील याबद्दल?- सर्वप्रथम मी माझी दिग्दर्शिका, निर्माती आणि सहकलाकार कंगना राणौतचे खूप आभार मानू इच्छितो. कारण तिने मला ही संधी दिली. अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेसाठी तिने माझी निवड केला, त्यासाठी मी तिचे आभार मानतो. तिच्यासोबत काम करताना खूप मजा आली. तसेच तिच्याप्रती एक वेगळा आदर निर्माण झाला आहे. एक अभिनेत्री म्हणून तिची जगभरात ख्याती आहे. मात्र एक दिग्दर्शक म्हणून तिचे ध्येय आहे आणि तिला काय दाखवायचे आहे, याबाबत ती ठाम आहेत. तिने उत्तम रितीने सर्वकाही जुळवून आणलं आहे, हे खरेच वाखाणण्याजोगे आहे. या चित्रपटाबाबत मी खूपच उत्सुक आहे. ही एक मोठी जबाबदारी आहे. त्यामुळेच माझ्या मनात कुठेतरी भीती आहे. ही जबाबदारी मी पेलू शकेन की नाही आणि लोकांना मी केलेले काम आवडेल की नाही, याचे जास्त दडपण आहे. उत्सुकतेसोबत जबाबदारीची भीती आणि जाणीवदेखील आहे. आम्ही जो प्रयत्न केला आहे, तो लोकांपर्यंत योग्यरित्या पोहचेल आणि लोकांना आवडेल अशी आशा मला आहे.
: अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिका साकारणं किती आव्हानात्मक होते? त्यासाठी कशी आणि काय काय तयारी केलीस?- ही भूमिका साकारणं अर्थात आव्हानात्मक होतं. कारण अटलजी असे एक राजकीय नेते आहेत. जे माजी पंतप्रधान, भारतरत्न प्राप्त आहेत. जगभरात त्यांचे अस्सीम चाहते आहेत. त्यांच्याप्रती जगभरातील लोकांमध्ये आदर आणि प्रेम आहे. खूप लोकांनी त्यांना जवळून पाहिले आहे आणि त्यांच्याबद्दल माहित आहे. अर्थात सगळ्या गोष्टी चित्रपटात आम्ही दाखवू शकलेलो नाही. पण चित्रपटासाठी आवश्यक आहे तेवढे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही भूमिका साकारणे चॅलेजिंग होते. कारण अशा दिग्गज व्यक्तीची भूमिका साकारणे खूप मोठी जबाबदारी होती. माझ्या दिग्दर्शिकेला काय मांडायचे आहे, याबाबत क्लिअर होती. तिनेसुद्धा या चित्रपटाचा विषय, तिच्या भूमिकेचा प्रचंड अभ्यास केला आहे. तिचा दृष्टीकोन आम्ही कलाकारांनी फॉलो केला आहे. कारण चित्रपटासाठी तुम्हाला कॅप्टनला फॉलो करावे लागते आणि आमच्या चित्रपटाची कॅप्टन कंगना आहे. तिला जे योग्य वाटलं ते आम्ही फॉलो केला आहे.
: अभ्यासू राजकारणी, संवेदनशील कवी अशी ओळख असणाऱ्या अटलजींची भूमिका साकारताना दडपण आले होते का?- एवढ्या मोठ्या व्यक्तीची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारल्यामुळे खूप दडपण आहे. चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या सकारात्मक आणि निगेटिव्ह कमेंट्स येणार आहेत. ही गोष्ट अटलजींची नसून इंदिरा गांधी यांची आहे. त्याच्यामध्ये अटलजींचं एक महत्त्वाचे पात्र आहे. त्या गोष्टीशी संदर्भात आम्ही जेवढ्या गोष्टी मांडू शकलो. त्यांच्या पात्राबद्दल जेवढी माहिती आहे आणि त्याहीपेक्षा जो काळ आम्ही चित्रपटात दाखवला आहे, त्या काळात ते कसे होते, तडफदार नेते होते. कवी म्हणून कसे होते. त्यांच्या मनात देशाबद्दल काय भावना होती, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा चित्रपटातला माझा पहिला लूक प्रदर्शित आला तेव्हा लोकांना अटलजी असे कसे दिसताहेत असा प्रश्न निर्माण झाला होता. जेव्हा त्या लोकांना कळलं की अटलजी तरुण असतानाची भूमिका श्रेयस करतो आहे, तेव्हा लोकांना माझा सिनेमातला लूक परफेक्ट आहे, असं वाटलं.
: इमरजेंसी सिनेमाचा तुझा प्रवास कसा होता?- या चित्रपटाचा प्रवास खूपच छान होता. मला वाटतं की माझ्यासाठी तो पटकन संपला. थोडा अजून चालला असता. अशा प्रोजेक्टमध्ये काम करायला मिळणं खूप मोठं भाग्य असतं. त्यात अशापद्धतीचं पात्र साकारायला मिळणं हे त्याहून मोठं भाग्य असतं. त्यामुळे असे वाटते हे जे पात्र आहे अजून जास्त अभ्यास करून आणखी बारकाईने स्क्रीनवर मांडता आले असते तर आणखी मजा आली असती. पण गोष्ट वेगळी असल्यामुळे त्या भूमिकेचा आवाकादेखील मर्यादीत आहे. त्यामुळे जेवढे माझ्याकडून होईल तितक्या प्रामाणिकपणे ही भूमिका साकारण्याचा प्रयत्न मी केला आहे.