Chandu Champion : सध्या कार्तिक आर्यनच्या "चंदू चॅम्पियन" चित्रपटाचं आणि त्याच्या कामाचं कौतुक केलं जातं आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेला कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' सिनेमा अखेर शुक्रवारी(१४ जून) प्रदर्शित झाला. भारतातील पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमात कार्तिकने मुरलीकांत यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता श्रेयस तळपदेही झळकला आहे. मुरलीकांत पेटकर यांच्या बायोपिकमध्ये श्रेयसने पोलिस इन्स्पेक्टर सचिन कांबळेंची भुमिका साकारली आहे.
श्रेयस तळपदेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये श्रेयस पोलिसाच्या भुमिकेत दिसून येत आहे. श्रेयस तळपदेने पोस्टमध्ये लिहिलंय की, 'नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मुरलीकांत पेठकर यांच्या 'चंदु चॅम्पियन' या बायोपिकमध्ये मला पोलिस इन्स्पेक्टर सचिन कांबळेंची भूमिका साकारण्याचा मोठा मान मिळाला आहे. ज्यावेळी दिग्दर्शक कबीर खान यांनी मला चित्रपटाचं कथानक सांगितलं, तेव्हा सुरुवातीला मला आश्चर्य वाटलं की, आपल्या महाराष्ट्रातील अनेकांना या खऱ्या आयुष्यातील चॅम्पियनविषयी माहिती नाही. मला पोलिस इन्स्पेक्टर सचिन कांबळे यांची भूमिका दिल्याबद्दल दिग्दर्शक कबीर भाईंचे मनापासून आभार'.
श्रेयसने पुढे लिहलं, "माझा या भूमिकेसाठी विचार केल्याबद्दल कास्टिंग डायरेक्टर यांचेही मनापासून आभार. अनेकदा माझ्या मनात विचार यायचं की, तू माझा या भूमिकेसाठी का विचार केला असेल ? पण, तू योग्य निर्णय घेतलास. त्यासाठी तुझे आभार आय लव्ह यू डार्लिंग. कार्तिक आर्यनविषयी बोलायचं तर, तू खरा चॅम्पियन आहेस. तू खूप खरेपणाने "चंदू"ची भूमिका साकारली. बायोपिकमध्ये काम करणं हे खूप कठीण असतं, बायोपिकमध्ये काम करताना त्या पात्राप्रमाणे काम करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. तू चित्रपटामध्ये जीव ओतून काम केलं आहेस. 'चंदू चॅम्पियन' चित्रपट आणि तुझे येणारे सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर ठरोत हीच शुभेच्छा! 'चंदू चॅम्पियन' तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. नक्की पाहा…ही सुंदर कलाकृती पाहणं चुकवू नका', असं श्रेयसनं लिहलं आहे.
'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाची कथा मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. सुवर्णपदक विजेते पेटकर यांनी १९७० साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि त्यानंतर १९७२ साली जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशाचं नाव उज्वल केलं होतं. दरम्यान, श्रेयसच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याचा नुकताच 'कर्तम भुगतम' हा चित्रपट भेटीला आला.