Shreyas Talpade Reveals Phobia: प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचा फोबिया असतो. काहींना उंचावर गेल्यावर तिथून खाली पडू अशी किंवा अंधारात आपल्याला कोणीतरी इजा पोहोचवेल, अशी भीती सतावत असते. तर काहींना एखाद्या ठराविक प्राण्याची भीती असते. चित्रपटात १०-१० गुंडाना मारणाऱ्या हिरोला आपल्या खऱ्या आयुष्यात विशिष्ट गोष्टींची भीती अर्थात फोबिया आहे. नुकतंच मराठमोळ्या श्रेयस तळपदेनं (Shreyas Talpade) त्याला असलेल्या विचित्र फोबियाबद्दल सांगितलं.
श्रेयस तळपदेनं नुकतंच लोकमत फिल्मीशी बोलताना त्यानं फोबियाबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, "मजेशीर वाटले, पण मला ना झुरळ, पाल, उंदीर हे दिसलं की माझी फार पळापळ होते. जे माझे गावाकडचे मीत्र आहेत, त्यांना काहीच वाटतं नाही. ते झुरळ असो किंवा पाल ते हाताने पकडतात. उंदीराच्या मागे जाऊन त्याला पकडतात. मला ते कधीच जमणार नाही. मला त्या गोष्टींची एवढी भीती वाटते. बाकी तुम्ही मला काहीही करायला सांगा".
पुढे तो म्हणाला, "एक गोष्ट लहानपणी किंवा आताही मला शक्य नाहीये. जेव्हा मी गावी कणकवलीला जायचो, तेव्हा माझे मित्र, भावंड हे दणादण विहीरीत उड्या मारायचे. त्या विहीरीत बघितल्यावरच मला असं व्हायचं नको. ते मला पायऱ्यावरुन ये, हळूहळू ये, काय घाबरतो असं म्हणायचे. पण, मी नको म्हणायचो. मला असं वाटायचं हे कसं करता तुम्ही. त्या गोष्टीची अजूनही मनात थोडी भीती आहे".
श्रेयस तळपदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यानं 'झी मराठी'च्या 'चल भावा सिटीत' या नव्याकोऱ्या शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. या शोचा सूत्रसंचालक अभिनेता श्रेयस तळपदे आहे. या शोमध्ये गावाकडील मुले व शहरातल्या मुली स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातले स्पर्धक एकमेकांना आव्हान देतील अशी या कार्यक्रमाची संकल्पना आहे.