कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' सिनेमा नुकताच रिलीज झाला. यामध्ये तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. तर अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) झळकला आहे. त्याने ही भूमिका अगदी उत्तम साकारली आहे. इंदिरा-वाजपेयी भेटीचा सीनचंही प्रेक्षकांनी कौतुक केलं. पडद्यावर राजकारण्याची भूमिका साकारणाऱ्या श्रेयसला खऱ्या आयुष्यात राजकारणात किती रस आहे याचं उत्तर त्याने दिलं आहे.
'इमर्जन्सी' निमित्त श्रेयस तळपदेने लोकमत फिल्मीशी संवाद साधला. यावेळी त्याला खऱ्या आयुष्यात राजकारणात रस आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर श्रेयस म्हणाला, "राजकीय मत असणं, राजकीय भूमिका साकारणं आणि राजकारणात येणं या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राजकारण हे क्षेत्र खूप कठीण आहे. यात प्रवेश करणं, इथे काम करणं, अभ्यास करणं यासाठी खूप वेळ लागतो. मी हे करू शकेन का तर मला माहित नाही. माझा तो प्रांत नाही मला कारण अभिनय करायला आवडतो. तसंच राजकारणात बरेच दिगग्ज आहेत जे त्यांचं काम उत्तम करत आहेत. त्यामुळे मी त्यात कितपत फीट बसेन माहीत नाही. सध्या मी फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अशा तीनही भूमिका पार पाडतो आहे. त्यामुळे मी यातच खूश आहे."
श्रेयस तळपदे सध्या 'द इंडिया स्टोरी' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये त्याच्यासोबत साऊथ अभिनेत्री काजल अग्रवालही दिसणार आहे. तसंच तो 'वेलकम टू जंगल' सिनेमातही झळकणार आहे. यामध्ये अक्षय कुमारसह बरीच मोठी स्टारकास्ट आहे. इतकंच नाही तर मराठीमध्येही त्याचा प्रार्थना बेहेरेसोबतचा प्रोजेक्ट येणार आहे. त्यामुळे श्रेयस सध्या कामात पुरेपूर व्यस्त आहे.