अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'पुष्पा'(Pushpa)ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आणि बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. या चित्रपटानंतर चाहते याच्या सीक्वलची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याने पुष्पा या सिनेमाच्या हिंदी डबिंगमध्ये मुख्य कलाकार अल्लू अर्जुन याला म्हणजेच पुष्पाला हिंदीत आवाज दिला आहे. हा आवाज आणि त्यातील डायलॉग खूप लोकप्रिय झाला. हिंदी सिनेमाप्रेमींनी तर श्रेयसच्या आवाजाची तोंडभरून स्तुती केली होती. त्यामुळे श्रेयसचे चाहते पुन्हा एकदा त्याचा पुष्पाच्या सीक्वेलमध्ये आवाज ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान आता श्रेयसने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत या अनुभवाबद्दल सांगितले आणि अल्लूला भेटायचे राहून गेल्याचे सांगितले.
अल्लू अर्जुन यांना अजून पर्यंत भेटलो नाही. पण मला त्यांना भेटायला आवडेल. जेव्हा मी डबिंग करत होतो त्याआधी मी पुष्पा चित्रपट पाहिला मला खूप आवडला. डब करतानाअजिबात ध्यानीमनी नव्हतं की आवाजाला इतका चांगला रिस्पॉन्स मिळेल. फक्त एवढंच होतं की अल्लू अर्जुन यांनी स्क्रीनवर जी मेहनत केली, त्याला माझ्या आवाजातून न्याय देण्याची जबाबदारी माझी होती. मी खूश आहे की ते लोकांपर्यंत तशा पद्धतीने पोहचले. मी त्याला न्याय देऊ शकलो. ते लोकांना खूप आवडले.
श्रेयस पुढे म्हणाला की, अल्लू अर्जुन यांना मला भेटायला नक्कीच आवडेल आणि काम करायला देखील आवडेल. कारण कलाकार म्हणून ते उत्तम आहेत. अशा कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळणं मोठी बाब आहे.