मराठीतील पहिला रॅपर 'किंग जेडी' अर्थात श्रेयश जाधव बऱ्याच काळाने एक भन्नाट रॅप साँग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'टाईमपास रॅप ए, हा टाईमपास रॅप ए' असे बोल असणाऱ्या या गाण्यामध्ये सामाजिक विषय अतिशय मार्मिक पद्धतीने हाताळण्यात आले आहेत.
आपल्या अनोख्या रॅप सॉंगने तरुणाईला वेड लावणाऱ्या श्रेयशने 'मी पण सचिन' या चित्रपटातून दिग्दर्शनात यशस्वी पाऊल टाकत प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर परत श्रेयश आता नवीन रॅप साँग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. या रॅपमध्ये श्रेयशचे गाण्याला साजेशे असे वेगवेगळे लुक्स बघायला मिळत आहेत.
मुळात या गाण्यात सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या अधोरेखित करण्यात आल्यामुळे सामान्य माणसाला हे गाणे अधिकच जवळचे वाटेल.
या गाण्याचे दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांचे आहे. तर 'टाईमपास रॅप'ला हर्षवर्धन वावरे, करण वावरे आणि आदित्य पाटेकर या त्रिनीती ब्रदर्सचे संगीत लाभले असून हे गाणे व्हिडिओ पॅलेसच्या युट्युब चॅनेलवर पाहता येणार आहे.
'टाईमपास रॅप' साँगला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.