अभिनेता किरण माने (Kiran Mane) 'बिग बॉस मराठी'मधून घराघरात पोहोचले. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात ते सहभागी झाले होते. तल्लख बुद्धी आणि उत्तम खेळाच्या जोरावर त्यांनी रसिकांची मनं जिंकून घेतली होती. त्यांनी अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, 'बिग बॉस मराठी'मुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ते सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून ते आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होत असतात. दरम्यान नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.
किरण माने यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, "राजवाड्यावरनं तुला सतीश शेंगदानावाल्याकडचे शेंगदाने आनून दिन." आसं म्हन्लं की लहानपनी मी कितीबी रडून धिंगाना घातला असला तरी गप बसायचो. दादांना माझं हे गुपित नीट म्हायती होतं. कारन अख्ख्या सातार्यागत त्यांनाबी या शेंगदान्यांची भुरळ पडलीवती ! जगात भारी चव. त्यावेळी मी चारपाच वर्षांचा असेन, आज त्रेपन्न वर्षांचा हाय. आजबी आमची तिसरी पिढी, माझा पोरगा आरूष, राजवाड्यावर गेल्यावर सतीशरावांचे शेंगदाने खाल्ल्याशिवाय परत येत नाय. हे माझंच नाय, समस्त सातारकरांच्या पिढ्या-पिढ्यांचं 'व्यसन' हाय !
ते पुढे म्हणाले की, मी 'बिगबाॅस'मध्ये एकदोनवेळा म्हन्लो होतो की "यार,राजवाड्यावरचे शेंगदाने मी मिस करतोय." ते बघून सतीशरावांचं मन इतकं भरून आलं की त्यांनी जाहीर केलं "आमचा सातारचा बच्चन किरण माने आन् त्याच्या परीवारासाठी सतीश शेंगदानेवाल्याकडचे शेंगदाने तहहयात फ्री मिळनार !" काल लै दिवसांच्या गॅपनंतर सतीशरावांना भेटलो. "ऐSSSS किरSन आरं य्ये भावा." करत मिठीच मारली त्यांनी. मला म्हन्ले एक जानेवारीला "माझ्या व्यवसायाला पन्नास वर्ष पूर्न होनारंयत. या व्यवसायानं मला सगळं ऐश्वर्य दिलं. पैसा, बंगला, गाडी भरभराट झाली. सहा शाखा जोरात सुरू हायेत आजबी. त्याची परतफेड म्हनून येत्या एक जानेवारीला सकाळी दहा ते रात्री दहा सगळ्या सातारकरांना माझ्याकडचे स्पेशल एक नंबर शेंगदाने, महाबळेश्वरी फुटाने, डाळ, गुळ शेंगदाणा चिक्की, कडक वाटाणा, सोयाबीन, सुर्यफूलाची बी... काय पायजे ते, आन् कितीबी मी फ्री देनार ! त्या सुवर्णमहोत्सवी दिवसाचं उद्घाटन आमचा किरण माने करनार. तू पायजेच मला. शुटिंग बिटींगची कारनं मला सांगायची नाहीत." मला भरून आलं.
...मला शुन्यातनं विश्व निर्मान करनारी कष्टाळू मान्सं पाहीली की त्या मानसात माझा आज्जा नाना दिसतो ! माझा आज्जा शेतमजूर होता, नंतर मुंबईत मिलमध्ये हमालीबी केली. आमचे सतीश रावखंडे शेंगदानेवालेबी वखारीत हमाल होते. हातावर पोट. एक दिवस ती वखार जळली. हातचं काम गेलं. संसार कसा चालवायचा? हमाली करताना दहा पैसे, चार आने, आठ आने असे पैसे साठवून बावीस रूपये जमा झालेवते. त्यात शेंगदान्याचा व्यवसाय सुरू करूया असं डोक्यात आलं. मिठाचं प्रमान आणि भाजन्याची पद्धत हीच युनिक आन् सिक्रेट रेसीपी. बघता-बघता व्यवसाय नांवारूपाला आला. आज एवढं वय आनि पैशापान्यानं भक्कम होऊनबी सतीशराव आजबी राजवाड्यावरच्या श्टाॅलवर उभे राहुन सेवा देत असत्यात. सतीशराव तुमच्या कष्टाळू आणि दिलदार वृत्तीला कडकडीत सलाम ! लब्यू, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले.