मेरे साई ही मालिका सोनी वाहिनीवर प्रक्षेपित होत असून या मालिकेत प्रेक्षकांना साईबाबांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायला मिळत आहे. अबीर सुफी या मालिकेत साईबाबांच्या भूमिकेत आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा आणि या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत आता एका छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्याचा प्रवेश होणार आहे.
सिद्धान्त कर्णिक हा प्रसिद्ध टेलिव्हीजन आणि चित्रपट अभिनेता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई मालिकेत दाखल होण्यास सज्ज झाला आहे. तो या मालिकेत गणपतराव नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तो एक रंगमंचावर काम करणारा कलाकार आहे आणि आपली कला सादर करण्यासाठी शिर्डीस आला आहे. सिद्धान्त एक अष्टपैलू कलाकार आहे आणि त्याने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. पण त्यापैकी एकही भूमिका गणपतराव या पात्राशी जराही मिळती जुळती नाहीये. या मालिकेत सिद्धान्त कर्णिकची एंट्री साईबाबांच्या समधीच्या शताब्दीपूर्तीच्या दिवशी होणार आहे. गणपतराव हा अभिनय आणि संगीत या दोन्ही क्षेत्रात पारंगत असल्याचे मालिकेत दाखवले जाणार आहे. गणपतरावला आपल्या कलेचा खूप गर्व होतो आणि तो अहंकारी होतो असे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याच्या या स्वभावामुळे साईबाबा त्याला आपल्या व्यवसायात यशस्वी होत असतानाच विनम्र राहण्याची शिकवण देणार आहेत.
मेरे साई मधील गणपतराव ही व्यक्तिरेखा साकारणारा सिद्धान्त कर्णिक या मालिकेत काम करण्यास खूप उत्सुक आहे. तो सांगतो, “मालिकेतील माझ्या भूमिकेचे नाव गणपतराव आहे. तो एक सुप्रसिद्ध कलाकार आहे, जो आपली नाटके गावागावात सादर करतो. माझी भूमिका एका रंगमंच कलाकाराची आहे आणि प्रत्यक्षात मी देखील एक रंगकर्मी आहे. साईबाबा मालिकेत काम केल्यावर साईबाबा आणि त्यांच्या जीवन चरित्राबद्दलचे माझे कुतूहल खूपच वाढले आहे. साईंच्या समाधीस शंभर वर्षं पूर्ण होतील, त्या दिवशी मालिकेत माझा प्रवेश होणार आहे, त्याचा मला खूप आनंद होत आहे. गणपतराव या व्यक्तिरेखेसाठी, संस्कृतचे उच्चार अचूक व्हावेत यासाठी मी खास प्रशिक्षण देखील घेत आहे.”