अभिनेता सिद्धार्थ चांदेकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. सिद्धार्थ अनेकदा त्याचे चित्रपट आणि हँडसम लूकमध्ये चर्चेत असतो. पण, सध्या तो चर्चेत येण्याचं एक वेगळंच कारण आहे. सिद्धार्थने त्याची आई सीमा चांदेकर यांचं दुसरं लग्न लावून दिलं आहे. आईच्या उतारवयात एकटेपणा दूर करण्यासाठी तिचं पुन्हा लग्न लावून देऊन तिला जोडीदार मिळवून देणाऱ्या सिद्धार्थचं सर्वत्रच कौतुक होत आहे. सिद्धार्थने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत आईला शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थबरोबरच त्याची पत्नी आणि अभिनेत्री मिताली मयेकर हिनेदेखील सासूबाईंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सिद्धार्थच्या आईच्या दुसऱ्या लग्नाचे काही खास क्षण शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत मितालीने तिच्या सासूबाईंना खास शुभेच्छाही दिल्या आहेत. “Happy married life सासूबाई! माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते? खरंच मला अभिमान वाटते तुझा की हा एव्हढा मोठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला. आणि मला अभिमान वाटतो या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा. आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच. तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम,” असं मितालीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मितालीच्या या पोस्टवर चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट करत सिद्धार्थचं कौतुक करत त्याच्या आईला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थ आणि मिताली हेदेखील मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. २०२१मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती.