राज्य सरकारने नुकतंच सरकारी कागदपत्रांमध्ये संपूर्ण नावात आईच्या नावाचा उल्लेख करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं स्वागतही करण्यात आलं. पण असेही काही कलाकार आहेत, जे आधीपासूनच सोशल मीडियावर वडिलांच्या नावाबरोबरच आईचंही नाव लावतात. तर अनेक कलाकार त्यांच्या नावामध्ये वडिलांच्या जागी आईचं नाव लावतात. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आधीपासूनच त्याचं नाव "सिद्धार्थ सीमा चांदेकर" असं लिहितो. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने यामागचं कारण स्पष्ट केलं आहे,
सिद्धार्थने 'लोकमत फिल्मी'च्या 'नो फिल्टर' या शोमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने अभिनयातील करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यातबाबतही भाष्य केलं. सिद्धार्थने या मुलाखतीत नावामध्ये वडिलांच्याऐवजी आईचं नाव लावण्यामागचं कारणही सांगतिलं. तो म्हणाला, "आई एकटीच माझ्यासाठी सगळं काही आहे. ती माझे वडील, मैत्रीण, आई, बहीणही आहे. जर मधलं नाव ज्याने आपल्याला घडवलं त्याचं लावत असू...तर मग जिने मला घडवलं तिचं नाव मी लावलं पाहिजे. आणि ती व्यक्ती माझी आई आहे. तेव्हापासूनच मी ठरवलं की हेच माझं नाव आहे. कागदपत्रांवर आईचं नाव का लावलं जात नाही, हा मला पडलेला खरं तर प्रश्न आहे. आईचं नाव मधलं नाव म्हणून स्वीकारलं जात नाही. पण, जिथे मला शक्य आहे तिथे मी बदलून टाकलं आहे."
सिद्धार्थने आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाची वाट धरली. त्याने अग्निहोत्र मालिकेपासून अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर अनेक गाजलेल्या मालिका आणि सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा २' मध्ये सिद्धार्थ दिसला होता. काही महिन्यांपूर्वीच सिद्धार्थने आईचं दुसरं लग्न लावून दिलं. त्यासाठी त्याचं सर्वत्र कौतुकही झालं होतं.