Join us

'वेडात मराठे वीर...'मध्ये सिद्धार्थ जाधवची एंट्री? सोशल मीडियावरील 'त्या' फोटोवरुन चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 1:24 PM

एकीकडे सत्या मांजरेकरची एक्झिट तर आता आपल्या सिद्धूचा कलाकारांसोबत फोटो.

मराठी सिनेसृष्टीत सध्या एका चित्रपटाची खूप चर्चा आहे. तो म्हणजे 'वेडात मराठे वीर दौडले सात'. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या या सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सात शूरवीर मावळ्यांची कथा उलगडणार आहे. महेश मांजरेकर स्वत: सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. चित्रपटाच्या सेटवरील काही ना काही किस्से ऐकू येत असतानाच आता अभिनेता सिद्धार्थ जाधवचीही यामध्ये भूमिका असणार का या चर्चेला उधाण आले आहे. पण ही चर्चा नेमकी आली कुठून?

तर अभिनेता सिद्धार्थने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये सर्व सिद्धार्थसोबत इतर अभिनेते दिसत आहेत. जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहेत. सिद्धार्थसोबत दिसत असलेले सर्वच कलाकार 'वेडात मराठे...' मध्ये भूमिका साकारणार आहेत. यामध्ये अभिनेते प्रविण तरडे, जय दुधाणे, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके यांची भूमिका असणार आहे. आता या कलाकारांसोबत सिद्धार्थ काय करतोय असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या फोटोवरुनच आता सिद्धूने देखील सिनेमात एंट्री घेतली की काय अशी चर्चा जोर धरु लागली आहे. 

सिद्धार्थने जिममधला हा फोटो शेअर करत हटके पद्धतीने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा, आडवा होईपर्यंत व्यायाम करुन साजरा केला पाडवा.' असं भन्नाट कॅप्शन सिद्धूने पोस्टखाली लिहिले आहे.

महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाच्या चित्रीकरण जोरात सुरु आहे. भूमिकेच्या तयारीसाठी सर्वच कलाकार सध्या जिममध्ये वर्कआऊट करताना दिसतात. त्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या कलाकारांमध्ये सिद्धार्थला बघून चर्चेला उधाण आलं आहे. 

तर दुसरीकडे सिनेमातील या सात मावळ्यांमध्ये महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर देखील होता. मात्र आता तो चित्रपटातून बाहेर पडल्याच्या चर्चा आहेत तर आरोह वेलणकर सत्याची जागा घेणार असंही बोललं जात आहे. आता सिद्धार्थची खरंच एंट्री झाली आहे का आणि त्याची भूमिका नेमकी काय असणार लवकरच स्पष्ट होईल.

टॅग्स :सिद्धार्थ जाधवमहेश मांजरेकर मराठी चित्रपटप्रवीण तरडेहार्दिक जोशी