मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पिंपरी-चिंचवड येथे पार पडलेल्या मराठी नाट्यसंमेलनाला हजेरी लावली होती. पिंपरीवरुन मुंबईला प्रवास करताना खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांब रांगा पाहून राज ठाकरे संतापले. वाहतुक कोंडी असतानाही टोलवसुली सुरू असल्याचं पाहून राज ठाकरेंनी त्यांच्या स्टाइलमध्ये टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना खडसावलं आणि सगळ्या गाड्या सोडण्यास सांगितलं. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता याबाबत मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवने भाष्य केलं आहे.
सिद्धार्थचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अविनाश जाधव यांच्या सोशल मीडियावरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत सिद्धार्थने घडलेला प्रकार सांगत राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे. सिद्धार्थ म्हणतो, "राज ठाकरे यांच्याबरोबर नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही पुणे ते मुंबई असा प्रवास करत होतो. राज ठाकरे स्वत:गाडी चालवत होते आणि मी त्याच्यांच गाडीत बसलो होतो. खालापूर टोलनाक्याजवळ गाड्यांची लांब रांग लागली होती. त्यांच्या गाडीला रस्ता करून दिला होता. पण, साहेब थांबले आणि आम्हाला काही कळायच्या आत गाडीतून उतरले."
"त्यांनी टोलनाक्यावरील सर्व कर्मचाऱ्यांना राज ठाकरे स्टाइलमध्ये सर्व गाड्या सोडण्यास सांगितलं. ४-५ किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रुग्णवाहिकाही अडकली होती. लोक कंटाळले होते. पण, राज साहेबांनी सांगितल्यानंतर सगळ्या गाड्या सोडण्यात आल्या. पण, एवढंच करून ते थांबले नाहीत. सगळ्या गाड्या जाईपर्यंत आणि रुग्णवाहिकेला वाट मिळेपर्यंत साहेब तिथेच होते. निघताना पण, साहेबांनी सांगितलं की एकही गाडी थांबली नाही पाहिजे. पुढे पण वाशी टोलनाका किंवा इतर ठिकाणीही जिथे रांगा लागल्या होत्या. तिथे त्यांनी खडसावून सांगतिलं. माझ्यासाठी हा विलक्षण अनुभव होता," असंही त्याने सांगितलं.