मुंबई - ‘बिग बॉस’चा 13 वा सीझन गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla) गुरूवारी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याची प्राणज्योत मालवली. सिद्धार्थच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्री व त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते शोकाकूल आहेत. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घ्यावा, यावर अद्यापही चाहत्यांना विश्वास बसत नाही. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याची एक फॅन कोमात गेल्याची घटना घडली आहे. एका डॉक्टरने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.
डॉ. जयेश ठकेरने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थची एक चाहती त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. त्यानंतर डॉक्टरने ट्विट करून चाहत्यांना स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी या मुलीचा एक फोटो शेअर केला आहे. "मित्रांनो, तुमच्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी बोला, एकटे राहू नका, सिद्धार्थच्या एका फॅनला काल रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं, कारण ती वॉशरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली... कृपया स्वतःची काळजी घ्या... तिच्यासाठी प्रार्थना करा" असं म्हटलं आहे.
सिद्धार्थच्या आईने पोलिसांना दिला जबाब, सांगितलं रात्री काय घडलं
डॉक्टरांनी "जास्त ताणामुळे माणूस असा अंशत: कोमात जाऊ शकतो. मला वाटतं प्रत्येक चाहत्याने आता सावरायला हवं. शांत व्हा, झालेल्या घटनेचा जास्त विचार करणं थांबवावं आणि तुमचं मन विचलित होऊ देऊ नये. हे सोपं नाही, हे मला माहीत आहे. पण स्वतःला जपावं" असं देखील आपल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबत ट्विट केलं आहे. पोलिसांकडून सिद्धार्थच्या मृत्युची चौकशी सुरू असून निकटवर्तीयांचे आणि जवळच्या नातेवाईकांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. त्यानुसार, सिद्धार्थच्या आईचा जबाब नोंदविण्यात आला. त्यामध्ये, रात्रीपर्यंत सिद्धार्थ ठीक होता, रात्री जेवणानंतर तो झोपायला गेला. मात्र, सकाळी तो उठलाच नाही, असा जबाब आईने नोंदवला आहे. दरम्यान, यापूर्वीच सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी तो कुठल्याही मानसिक तणावात नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.
काय म्हणाला करण कुंद्रा?
सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जाण्यानं बॉलिवूड विश्वाला धक्का बसला आहे. सिद्धार्थचा मित्र करण कुंद्रालाही हा मोठा धक्का आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या सिरियलमध्ये दोघांनी एकत्र काम केले आहे. सिद्धार्थच्या मृत्यूपूर्वी करण कुंद्रासोबत त्याचं अखेरचं बोलणं झालं होतं. करण कुंद्रानं सिद्धार्थ शुक्लासोबतचा फोटो शेअर करत सोशल मीडियात पोस्ट केले आहे. शॉकिंग, काल रात्रीच आम्ही दोघं फोनवर बोलत होतो. आमच्या दौघांपैकी इंडस्ट्रीमध्ये कोण चांगलं काम करतंय यावर चर्चा होत होती. विश्वास बसत नाही, मित्रा तू लवकर गेलास. नेहमी हसत राहा. खूप दु:खं होतंय असं त्याने सांगितले आहे.