बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरूवारी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. तो ४० वर्षांचा होता. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला आहे. यादरम्यान इंस्टाग्रामवरील सिद्धार्थ शुक्लाची शेवटची पोस्ट खूप व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टमध्ये त्याने एक फोटो शेअर करत फ्रंटलाइन वर्कर्सचे आभार मानले होते.
सिद्धार्थ शुक्लाने इंस्टाग्रामवर २४ ऑगस्टला फोटो शेअर करत लिहिले होते की, सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचे मनापासून आभार. तुम्ही तुमच्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करतात. त्या रुग्णांना आराम देतात जे त्यांच्या कुटुंबासोबत राहू शकत नाही. तुम्ही वास्तविकतेत खूप शूर आहेत. फ्रंटलाइनमध्ये राहणे सोप्पे नाही. मात्र आम्ही वास्तविकतेमध्ये तुमच्या प्रयत्नांचे कौतुक करतो. #MumbaiDiariesOnPrime या सुपरहिरोंसाठी सफेद टोपी, नर्सिंग स्टाफ आणि असंख्य त्यागासाठी ही श्रद्धांजली आहे. २५ ऑगस्ट ट्रेलर आऊट.#TheHeroesWeOwe.'
सिद्धार्थ शुक्ला टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा होता. बिग बॉस १३व्या सीझनचा विजेता ठरला होता. याशिवाय ‘खतरों के खिलाडी ७’चाही तो विजेता होता. बालिका वधू या मालिकेतून तो लोकप्रिय झाला होता. मुंबईत १२ डिसेंबर १९८० रोजी जन्मलेल्या सिद्धार्थने मॉडेल म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली होती.
२००४ साली त्याने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. २००८ साली ‘बाबुल का आंगन छूटे ना’ या मालिकेत तो झळकला. पण त्याला खरी ओळख दिली ‘बालिका वधू’ या मालिकेने. टीव्ही इंडस्ट्रीत लोकप्रिय झाल्यानंतर बॉलिवूडमध्येही तो झळकला. २०१४ साली ‘हंम्टी शर्मा की दुल्हनिया’ या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यावर्षी ‘ब्रोकन बट ब्युटिफुल’ या वेबसीरिजमध्येही तो दिसला होता.