Join us

  सिद्धार्थ शुक्लाच्या आईचे ‘ते’ शब्द ऐकून सिस्टर शिवानीही झाल्या थक्क, पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 10:58 AM

सिद्धार्थ शुक्लाच्या प्रार्थनासभेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ब्रह्मकुमारीच्या सिस्टर शिवानी सिद्धार्थ शुक्लाच्या आईबद्दल बोलताना दिसत आहेत. 

ठळक मुद्देसिद्धार्थची आई अनेक वर्षांपासून ब्रह्मकुमारी केंद्राशी संबंधित आहेत आणि सिद्धार्थ अनेकदा ब्रह्मा कुमारी केंद्रात जायचा. 

सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) अकाली निधनानं सर्वांनाच धक्का बसला आहे. काल सिद्धार्थ शुक्लासाठी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रार्थना सभेत सिद्धार्थच्या कुटुंबीयांसोतच मित्रमंडळी व ब्रह्मकुमारी सिस्टर्स सहभागी झाल्या होत्या. या प्रार्थनासभेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ब्रह्मकुमारीच्या सिस्टर शिवानी ( Brahma Kumari Sister Shivani) सिद्धार्थ शुक्लाच्या आईबद्दल बोलताना दिसत आहेत. सिद्धार्थचा मित्र पारस छाब्राने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

यात सिस्टर शिवानी सिद्धार्थची आई रिटा शुक्ला यांच्याबद्दल म्हणतात, ‘2 तारखेला संध्याकाळी मी रिटा बहनसोबत (सिद्धार्थची आई) फोनवर बोलली. त्या फोनवर आल्या. त्यांच्या मुखातून पहिला शब्द बाहेर पडला तो म्हणजे ओम शांती... त्या ओम शांती या शब्दात इतके स्थैर्य व शांती होती की मला वाटलं, देवा ही कोणती शक्ती आहे जी या आईच्या मुखातून बोलतेय. रिटा बहन तुम्ही ठीक आहात ना? असं मी त्यांना विचारलं. यावर माझ्यासोबत परमात्म्याची शक्ती आहे, असं त्या म्हणाल्या.’ सिस्टर पुढे म्हणतात, ‘ किती महान आत्मा आहे. ज्याची आई इतकी महान असेल त्या मुलासाठी त्याक्षणी माझ्या मनातून एकच संकल्प बाहेर पडला. तो म्हणजे, तो जिथं असेल तिथं आनंदी राहिल.’या व्हिडीओनंतर लोक सिद्धार्थच्या आत्म्याला शांती आणि त्याच्या आईला शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत आहेत. सिद्धार्थची आई अनेक वर्षांपासून ब्रह्मकुमारी केंद्राशी संबंधित आहेत आणि सिद्धार्थ अनेकदा ब्रह्मा कुमारी केंद्रात जायचा.  सिद्धार्थचे अंतिम संस्कार देखील ब्रह्मकुमारी प्रथेनुसार करण्यात आले.

गत 2 सप्टेंबरला सिद्धार्थचं निधन झालं. कथितरित्या हृदयविकाराच्या झटक्याने त्याची प्राणज्योत मालवली. काल सिद्धार्थच्या निधनाच्या 4 दिवसानंतर त्याच्या कुटुंबाच्या वतीने एक स्टेटमेंट जारी करण्यात आले होते. या स्टेटमेंटमध्ये त्याच्या कुटुंबीयांनी सिद्धार्थ शुक्लाच्या जीवन प्रवासातील प्रत्येक माणसाबद्दल   कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसचं कुटुंबाच्या प्रायव्हसीचा मान राखावा अशी विनंती केली आहे.  सिद्धार्थ कायम आपल्या हृदयात राहील, असंही यात म्हटलं आहे. 

टॅग्स :सिद्धार्थ शुक्ला