Sidhu MooseWala murder Case : पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला (Sidhu MooseWala ) यांच्या हत्येनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. केवळ पंजाबच नाही तर संपूर्ण देश या घटनेनं हादरला आहे. पंजाबातील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा कॅनडास्थित साथीदार गोल्डी ब्रार याने सिद्धू यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.
रविवारी 29 मे रोजी सिद्धू मूसेवालांवर अंदाधुंद गोळीबार झाला. मारेकऱ्यांनी त्याच्या देहाची अक्षरश: चाळण केली. घटना घडली तेव्हा मूसेवालांसोबत त्यांचे दोन मित्र गाडीत होते. गोळीबारात ते सुद्धा जखमी झालेत. सिद्धू यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पण त्याचे दोन मित्र सुदैवानं बचावले आहेत. या मित्रांनी घटनेबद्दल माहिती दिली. अंदाधुंद गोळीबार होत असताना सिद्धू घाबरला नाही, उलट अखेरच्या क्षणापर्यंत तो लढला, असं त्यांनी सांगितलं.
सिद्धूनेही केले दोन फायर पण...घटनेवेळी सिद्धू मूसेवालांसोबत असलेला त्याचा मित्र गुरविंदर हा सुद्धा जखमी झाला. त्याने सांगितले की, ‘रविवारी सिद्धू आपल्या आजारी मावशीला पाहण्यासाठी आपल्या गावी निघाला होता. आम्ही मानसाच्या जवाहरकेमध्ये पोहोचलो तोच आमच्यावर हल्ला झाला. मी गाडीत मागे बसलो होतो आणि आमचा एक मित्र गुरप्रीत सिंह सिद्धूसोबत समोरच्या सीटवर बसला होता. गाडीत पाच लोक बसतील इतकी जागा नव्हती, त्यामुळे सिद्धूने सुरक्षारक्षकांना सोबत घेतलं नव्हतं. गावापासून काही दूर अंतरावर आमच्या गाडीवर मागून गोळीबार झाला. इतक्यात एक गाडी अचानक आमच्या थार गाडीच्या समोर येऊन थांबली. त्या गाडीतून एक तरूण उतरला आणि त्याने आमच्यावर अंदाधूंद गोळीबार सुरू केला. सिद्धूनेही आपल्या बंदुकीतून दोन गोळ्या चालवल्या. पण मारेकऱ्यांकडे ऑटोमॅटिक गन होती. ते सतत गोळीबार करत राहिले. सिद्धूने दोन फायर करताच हल्लेखोरांनी तिन्ही बाजूंनी आमच्यावर गोळ्या चालवल्या. अशाही स्थितीत सिद्धूने गाळी पळवण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला तिन्ही बाजूंनी घेरलं होतं. गाडीला रस्ता मिळाला असता तर कदाचित सिद्धू वाचू शकला असतो. सिद्धू मारेकऱ्यांशी शेवटच्या क्षणापर्यंत लढला. त्याने त्यांना कडवी झुंज दिली.’
सिद्धू मूसेवाला पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म 17 जून 1993 रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला होता. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.